(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित शर्माने केलेला करिश्मा हार्दिक पांड्याला करता येईल का?
Hardik Pandya As Captain In IPL : तब्बल दहा वर्षानंतर मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या जागी मुंबईने हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली.
Hardik Pandya As Captain In IPL : तब्बल दहा वर्षानंतर मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या जागी मुंबईने हार्दिक पांड्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घातली. आयपीएल 2024 आधी मुंबईने चाहत्यांना मोठा धक्का दिला. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. आता रोहितला बाय बाय करत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलेय. पण रोहित शर्माने केलेला करिश्मा हार्दिक पांड्याला करता येईल का? याची चर्चा सरु झाली आहे. हार्दिक पांड्याचं आयपीएल करियर कसे राहिलेय.. याबाबत पाहूयात..
हार्दिक पांड्याने 2015 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पदार्पण केले. हार्दिक पांड्या सात हंगामात मुंबईचा महत्वाचा सदस्य राहिलाय. पण आयपीएल 2022 मध्ये मुंबईने हार्दिक पांड्याला रिटेन केले नाही. हार्दिकला गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतलं अन् कर्णधार केले. हार्दिक पांड्याने गुजरातला पदार्पणातच जेतेपद पटकावून दिले. अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने शानदार कामगिरी केली. गुजरातला जेतेपद मिळवून देण्यात हार्दिकने मोठी भूमिका बजावली. 2023 आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातचा संघ उप विजेता ठरला.
कर्णधार म्हणून हार्दिकचा रेकॉर्ड कसा राहिला ?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातच्या संघाने शानदार कामगिरी केली. पदार्पणात जेतेपद पटकावले, त्यानंतर यंदा उपविजेतेपद मिळवले. हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये दोन वेळा कर्णधार राहिलाय, या दोन्ही वेळा संघ फायनलमध्ये पोहचलाय. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड शानदार राहिलाय. पण आता हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झालाय. मुंबईला सहावे जेतेपद पटकावून देण्याची जबाबदारी हार्दिकच्या खांद्यावर आहे.
हार्दिकचं आयपीएल करियर -
हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीत तो प्रभावी ठरलाय. त्याने 123 आयपीएल सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सचा तो भाग राहिला. IPL मध्ये हार्दिक पांड्याने 145.86 च्या सरासरीने आणि 145.86 च्या स्ट्राईक रेटने 2309 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने गोलंदाजीत 53 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील हार्दिक पांड्याचा इकॉनॉमी 8.8 इतकी राहिली आहे.
मुंबईने हार्दिकची निवड का केली ?
हार्दिक पांड्याने गुजरातची धुरा संभाळताच पदार्पणातच चॅम्पियन केले, इतकेच नाही तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात संघाने सातत्याने शानदार कामगिरी केली. त्याशिवाय टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी टीम इंडियाचे नेतृत्वही हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. त्याने लागोपाठ भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. अशा स्थितीत रोहित शर्माच्या जागी मुंबईला हार्दिक पांड्या शानदार रिप्लेसमेंट वाटली.
हार्दिक पांड्या आयपीएल 2022 पासून शानदार लयीत आहे. त्याने मागील दोन हंगामात गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार प्रदर्शन केलेय. दीड वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरही वनडे आणि टी 20 मध्ये हार्दिकने प्रभावी कामगिरी केली आहे. शानदार प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाची धुराही यशस्वी संभाळळी, त्यामुळेच संघाचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्यावर डाव खेळलाय.