(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
GT vs DC, IPL 2024 : संथ खेळपट्टीवर अवघ्या 89 धावांत गुजरातचा संघ ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरदाखल दिल्लीने हे आव्हान 6 विकेट आणि 67 चेंडू राखून सहज पार केले केले.
GT vs DC, IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सचा संघ आपल्याच जाळ्यात अडकला. संथ खेळपट्टीवर अवघ्या 89 धावांत गुजरातचा संघ ऑलआऊट झाला होता. प्रत्युत्तरदाखल दिल्लीने हे आव्हान 6 विकेट आणि 67 चेंडू राखून सहज पार केले केले. दिल्लीकडून जैक फ्रेजर-मैकगर्क यानं झटपट 20 धावा केल्या, तर शाय होप, अभिषेक पोरेल आणि ऋषभ पंत यांनीही शानदार फलंदाजी केली. गुजरातचा सात सामन्यात हा चौथा पराभव झाला तर दिल्लीने सात सामन्यात तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्लीने नवव्या क्रमांकावरुन थधेट सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गुजरातचा संघ सहाव्या क्रमांकावरुन सातव्या स्थानावर पोहचला आहे.
गुजरातनं दिलेल्या 90 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने वादळी सुरुवात केली. सलामी फलंदाज जैक फ्रेजर-मैकगर्क यानं आपले इरादे स्पष्ट करत षटकाराने सुरुवात केली. जैक फ्रेजर-मैकगर्क यानं गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत दिल्लीला शानदार सुरुवात करुन दिली. पण स्पेन्सर जॉन्सन यानं जैक फ्रेजर-मैकगर्क याला बाद करत गुजरातला पहिलं यश मिळवून दिलं. जैक फ्रेजर-मैकगर्क यानं 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. जैक फ्रेजर-मैकगर्क बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉही लगेच तंबूत परतला. दिल्लीने लागोपाठ दोन विकेट गमावल्यामुळे सामना रोमांचक होईल, असं वाटत होतं. पण शाय होम आणि अभिषेक पोरेल यांनी दिल्लीचा डाव संभाळला. पृथ्वी शॉ याला फक्त सात धावांचं योगदान देता आले.
सलामी फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतरशाय होप आणि अभिषेक पोरेल यांनी हल्लाबोल केला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. दिल्लीने पॉवरप्लेमध्येच आपला विजय निश्चित केला होता. पण दोघेही तंबूत परतले. अभिषेक पोरेल यानं सात चेंडूमध्ये 15 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. तर शाय होप यानं 10 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. शाय होप यानं दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 19 धावांची खेळी केली.
दिल्लीने पहिल्या सहा षटकांमध्येच विजयाकडे आगेकूच केली. फक्त 90 धावांचा बचाव करताना गुजरातकडून प्रतिकार करण्यात आला. पहिल्या सहा षटकामध्ये दिल्लीच्या चार फलंदाजांना तंबूत धाडलं होतं. दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये चार विकेटच्या मोबदल्यात 67 धावा केल्या होत्या. जैक फ्रेजर-मैकगर्क 20, पृथ्वी शॉ 7, अभिषेक पोरेल 15 आणि शाय होप 19 यांनी झटपट धावा काढण्याच्या नादात विकेट फेकल्या. पण कर्णधार ऋषभ पंत आणि सुमितकुमार यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला.
चार फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि सुमित कुमार यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला. ऋषभ पंत यानं 11 चेंडूमध्ये नाबाद 16 धावा केल्या. यामध्ये एक चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. सुमित कुमार यानं दोन चौकारांच्या मदतीनं 9 धावा केल्या.
गुजरातकडून संदीप वॉरियर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं दोन फलंदाजांना तंबूत पाठलं. तर राशीद खान आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.