अजिंक्य रहाणेला फक्त IPL मुळे संघात स्थान मिळाले नाही... रणजीमध्ये धावांचा पाडलाय पाऊस
Ajinkya Rahane : मुंबईच्या अजिंक्य रहाणेनं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलसाठी तब्बल 16 महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे.
Ajinkya Rahane : मुंबईच्या अजिंक्य रहाणेनं जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलसाठी तब्बल 16 महिन्यांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली ही फायनल 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडमधल्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात येईल. अजिंक्य रहाणेचा यंदाच्या आयपीएल मोसमातला फॉर्म लक्षात घेऊन त्याला जागतिक कसोटी विजेतेपद फायनलसाठी संधी देण्यात आली असं म्हणण्यात येत आहे. कारण चेन्नईच्या कोलकात्यावरच्या विजयात त्यानं निर्णायक भूमिका बजावली होती. अजिंक्यनं त्या सामन्यात 29 चेंडूंत 71 धावांची खेळी उभारली होती. पण भारताच्या कसोटी संघामधल्या पुनरागमनासाठी अजिंक्यला राष्ट्रीय सामन्यांमधली सातत्यपूर्ण कामगिरी अधिक फळली आहे. दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेची भारताच्या कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. जानेवारी २०२२मधल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याला सातत्यानं भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं. बीसीसीआयच्या कॉण्ट्रॅक्ट यादीतही अजिंक्यचा यंदा समावेश करण्यात आला नव्हता. अजिंक्य रहाणेला संघातून वगळल्यानंतर रणजी सामन्यात खेळण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला होता.
अजिंक्य रहाणे याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहेच. पण त्याला फक्त आयपीएलच्या कामगिरीच्या आधारवर संघात स्थान दिले नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणे याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 202-23 च्या हंगामात अजिंक्य रहाणे याने मुंबई संघाचे नेतृत्व केले होते. रणजी सामन्यात अजिंक्य रहाणे याने ११ डावात ५८ च्या सरासरीने ६३४ धावा केल्या. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे. अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर टीम इंडियाला एका अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यातच अजिंक्य रहाणे भन्नाट फॉर्मात परतला.. रणजी आणि आयपीएलमधील कामगिरी पाहाता बीसीसीआयने अजिंक्यला टीम इंडियात स्थान दिलेय. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियासाठी पुन्हा फलंदाजीला उतरेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर मालिकेत संघात सहभागी असलेला आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव, फिरकीपटू कुलदीप यादव व यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. सूर्यकुमार यादव याला कसोटीत छाप पाडता आली नाही. ‘बीसीसीआय’च्या पाच सदस्यीय निवड समिती आणि सचिव जय शहा यांच्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने बैठकीत टीम इंडियाच्या १५ सदस्यांची निवड करण्यात आली. श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर गेल्याने रहाणे संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. अजिंक्य रहाणेने आतापर्यंत 82 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळला होता. त्यानंतर रहाणेने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना धावांचा पाऊस पाडला होता. त्याशिवाय आता आयपीएलमध्येही रहाणे याने दमदार फलंदाजी केली आहे. अजिंक्य रहाणे याला फक्त आयपीएलच्या कामगिरीच्या आधारावर कसोटी संघात स्थान मिळाले नाही. देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीही पाहण्यात आली.
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट