(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2020, RRvs KXIP: राजस्थान रॉयल्सने पंजाबचा विजयरथ रोखला; प्ले ऑफसाठीची चुरस वाढली
पंजाबकडून ख्रिस गेलने 63 चेंडूत 99 धावांचे तुफानी खेळी केली. गेलने या खेळीत आठ षटकार आणि सहा चौकार लगावले.
IPL 2020, RRvs KXIP: राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सने दमदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेलं 185 धावांचं आव्हान राजस्थानने 17.3 षटकात पूर्ण करत मोसमातील सहावा विजय साजर केला. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने सुरुवातीला केलेली फटकेबाजी निर्णायक ठरली. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 26 चेंडूत 50 धावा केल्या तर संजू सॅमसनने 25 चेंडूत 48 धावा केल्या. रॉबिन उथप्पाने 23 चेंडूत 30, स्टीव्ह स्मिथने 20 चेंडूत तर जोस बटलरेने 11 चेंडूत 22 धावा केल्या.
त्याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्सला 186 धावांचे लक्ष्य दिले. पहिल्याच षटकात सलामीवीर मनदीपसिंग खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने त्याला माघारी धाडलं. पंजाबची सुरुवात खराब झाली. त्यानंतर केएल राहुल आणि ख्रिस गेलने दुसर्या विकेटसाठी 120 धावांची मजबूत भागीदारी केली. राहुलने 41 चेंडूत 46 धावा केल्या. राहुलने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.. तर पंजाबकडून ख्रिस गेलने 63 चेंडूत 99 धावांचे तुफानी खेळी केली. गेलने या खेळीत आठ षटकार आणि सहा चौकार लगावले. त्यानंतर अखेरच्या षटकांत निकोलस पूरनने अवघ्या 10 चेंडूत 22 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार लगावले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने चार षटकांत 26 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. तर बेन स्टोक्सने चार षटकांत 32 धावा देऊन दोन बळी घेतले.
ख्रिस गेलच्या नावे नवा विक्रम
गेल राजस्थानविरुद्धच्या खेळीत आठ षटकार लगावत एक विक्रम आपल्या नावे केला. गेलने टी- 20 मध्ये 1000 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. गेल आज फलंदाजीला उतरला तेव्हा त्याच्या नावे 993 षटकांराची नोंद होती. गेलने तुफानी खेळी करत डावाच्या 19 व्या षटकात कार्तिक त्यागीच्या 5 व्या चेंडूवर कारकिर्दीतील 1000 वा षटकार लगावला. पण त्याचं शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. तो 99 धावांवर बाद झाला. या यादीमध्ये कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानावर आहे. पोलार्डच्या नावावर टी -20 क्रिकेटमध्ये 690 षटकार तर गेलच्या नावावर 1 हजार षटकार आहेत. पोलार्ड गेलपेक्षा खूप मागे आहे, त्यामुळे गेलचा हा विक्रम मोडणे आता अशक्य मानले जात आहे.