IPL 2020 : मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार स्मिथला दणका, 12 लाखांचा दंड
मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात राजस्थान रॉयल्सने चांगली सुरुवात केली होती, परंतु दोन सामने जिंकल्यानंतर संघ सलग तीन राजस्थानने गमावले आहेत. मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटसाठी स्मिथला 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
इंडियन प्रीमियर लीगने एक निवेदन जारी करून स्मिथला दंडाची माहिती दिली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला अबूधाबी येथे मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओवर रेटसाठी दोषी ठरल्याबद्दल 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं आयपीएलकडून सांगण्यात आलं आहे.
स्टीव्ह स्मिथ हा पहिला कर्णधार नाही जो या हंगामात स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदा कमी ओव्हर रेटमुळे 12 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर दिल्लीचा कर्णधार श्रेयश अय्यरसुद्धा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरला आणि त्याला 12 लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला.
या तिन्ही कर्णधारांची या हंगामात पहिली चूक असल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात यापैकी कोणत्याही कर्णधाराला पुन्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळल्यास त्याच्यावर मॅच बंदीदेखील लागू केली जाऊ शकते.
राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव
अबुधाबीच्या मैदानात मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईनं राजस्थानला 194 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या अचूक माऱ्यासमोर राजस्थानचा डाव 19.1 षटकात 136 धावात आटोपला. राजस्थानच्या जोस बटलरनं 70 धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. मुंबईकडून जसप्रीत बुमरानं 20 धावात 4 फलंदाजांना माघारी धाडलं. तर ट्रेन्ट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सननं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मुंबईचा यंदाच्या मोसमातला हा सहा सामन्यातला चौथा विजय ठरला. तर राजस्थानला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्ससमोर 194 धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मुंबईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावांचा डोंगर उभारला. मुंबईकडून सूर्यकुमार यादवनं 47 चेंडूत नाबाद 79 धावांची खेळी केली. त्यात 11 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. सूर्यकुमारचं यंदाच्या मोसमातलं हे पहिलच अर्धशतक ठरलं. याशिवाय कर्णधार रोहित शर्मानं 35 तर हार्दिक पंड्यानं नाबाद 30 धावा फटकावल्या.
या विजयासह मुंबई इंडियन्सने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. मुंबईचे सहा पैकी चार सामने जिंकत आठ गुण आहेत. तर राजस्थान रॉयल्स सातव्या स्थानावर आहे.