एक्स्प्लोर
रहीमची झुंज, दिवसअखेर बांगलादेश 6 बाद 322

हैदराबाद : शाकिब उल हसन, मुश्फिकर रहीम आणि मेहदी हसनच्या झुंजार खेळींनी हैदराबाद कसोटीत नवा रंग भरला. बांगलादेशनं या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात सहा बाद 322 धावांची मजल मारली आहे. मात्र बांगलादेश भारतापेक्षा अजूनही 365 धावांनी पिछाडीवर असून, त्यांच्या हाताशी चारच विकेट्स शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा मुश्फिकर रहीम 81 धावांवर तर मेहदी हसन 51 धावांवर खेळत होता. त्याआधी शाकिब अल हसननं 82 धावांची खेळी केली होती. भारताकडून उमेश यादवनं दोन तर ईशांत शर्मा, रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रत्येकी एक विकेट काढली. त्याआधी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडवली. बांगलादेशचे चार पलंदाज 109 धावात तंबूत परतले. उमेश यादवने 2 तर इशांत शर्माने 1 फलंदाज माघारी धाडला. तर सलामीवीर तमीम इक्बाल धावबाद झाला. बांगलादेशने कालच्या 1 बाद 41 धावांवरुन तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र धावसंख्येत 3 धावांची भट टाकून तमीम इक्बाल माघारी परतला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इक्बाल (25) धावबाद झाला. त्यानंतर मग मोमीनूल हकला (12) उमेश यादवने पायचित केलं, तर धोकादायक मोहमद्दुल्लाचा (28) अडथळा इशांत शर्माने दूर केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं सलग चौथ्या कसोटी मालिकेत चौथं द्विशतक ठोकून, हैदराबाद कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. विराट कोहलीच्या या द्विशतकाला रिद्धिमान साहाचं शतक, तसंच अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजा यांच्या अर्धशतकांचीही जोड लाभली. त्यामुळंच भारताला आपला पहिला डाव सहा बाद 687 धावसंख्येवर घोषित करता आला. भारतीय डावाच्या उभारणीत विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चौथ्या विकेटसाठी 222 धावांची भागीदारी रचून मोलाचा वाटा उचलला. मग रिद्धिमान साहा आणि रवींद्र जाडेजानं सातव्या विकेटसाठी 118 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारतीय डावाला आणखी मजबुती दिली. विराट कोहलीनं 204 धावांची खेळी केली तर रिद्धिमान साहानं नाबाद 106 धावा फटकावल्या. अजिंक्य रहाणेनं 82, तर रवींद्र जाडेजानं नाबाद 60 धावांची खेळी केली. त्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या दिवसअखेर एक बाद 41 धावांची मजल मारली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















