(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारताचा डावखुरा गोलंदाज सौरभ नेत्रावळकर अमेरिकेचा कर्णधार
सौरभनं 2013 साली कर्नाटकविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो 2015 साली भारतभूमीचा निरोप घेऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाला होता.
मुंबई : अंडर- 19 चा 2010 सालचा विश्वचषक गाजवणारा भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. मूळचा मुंबईकर असलेल्या सौरभची अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
सौरभनं 2013 साली कर्नाटकविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यात मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो 2015 साली भारतभूमीचा निरोप घेऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत दाखल झाला होता. कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यानं भारतात प्रथम दर्जाच्या क्रिकेटला रामराम ठोकला होता.
सौरभने 2010 सालच्या अंडर-19 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि पाकिस्तानचा फलंदाज अहमद शहजाद यांनाही या स्पर्धेत सौरभने बाद केलं होतं. मात्र पुढील शिक्षणासाठी सौरभने क्रिकेटला रामराम ठोकून अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र क्रिकेटने त्याला तिथेही सोडलं नाही.
सॅन फ्रान्सिस्कोमधल्या कॉर्नेल विद्यापीठ शिकताना सौरभचा अमेरिकेत पुन्हा क्रिकेटशी संबंध आला. आज तीन वर्षांनी अमेरिकेच्या कर्णधारपदाची धुरा त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
सौरभच्या नेतृत्वाखालील अमेरिका संघ पुढील आठवड्यात ओमानमध्ये आयसीसीच्या वर्ल्ड क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे.