क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरलं! मंत्रिमंडळ बैठकीत महिला संघाचं अभिनंदन, महाराष्ट्राच्या 3 खेळाडूंना घसघशीत इनाम मिळणार
भारतीय महिला संघाने जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला.

Mumbai: भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women Cricket Worldcup) जिंकून इतिहास रचला आहे. या भव्य यशानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत संघाचे औपचारिक अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. भारतीय महिला संघाने जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी अभिमान व्यक्त केला.
महाराष्ट्रातील खेळाडूंना देणार रोख पारितोषिक
महाराष्ट्रातील खेळाडूंनी या विजयात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य सरकारने त्यांना रोख पारितोषिकाने गौरवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव या तिन्ही खेळाडूंनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभरात उजळवलं आहे. त्यासाठी आम्ही मंत्रिमंडळात अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. आपल्या धोरणानुसार महाराष्ट्रातील तिन्ही मुलींना राज्य सरकारकडून रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यांच्या सन्मानाचा निर्णय घेतला असून, ही संपूर्ण टीम जेव्हा मुंबईत येईल, तेव्हा राज्य सरकारकडून त्यांचा औपचारिक सत्कार केला जाईल.”
महिला संघाच्या या ऐतिहासिक विजयाने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या या यशामुळे राज्यातील अनेक तरुणी क्रिकेटकडे नव्या उत्साहाने पाहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय केवळ अभिनंदनापुरता मर्यादित न राहता, राज्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. या सन्मानामुळे भविष्यात महिला क्रिकेटपटूंना आपलं कौशल्य जागतिक स्तरावर दाखवण्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

























