एक्स्प्लोर
INDvsSL : भारताने पाचशेचा टप्पा ओलांडला
श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत भारताने पाचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे.
कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत भारताने पाचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. भारताचे 7 फलंदाज माघारी परतले आहेत.
कोलंबो कसोटीत भारताने उपहारापर्यंत 5 बाद 442 धावा केल्या. त्यावेळी आर अश्विन 47 तर रिद्धीमान साहा 16 धावांवर खेळत होते. उपहारानंतर अश्विन अर्धशतक झळकावून माघारी परतला. रंगना हेरथने त्याला 54 धावांवर त्रिफळाचीत केलं.
यानंतर मग हार्दिक पांड्या झटपट 20 धावा करुन माघारी परतला.
दरम्यान उपहारापूर्वी भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. भारताचे दोन्ही शतकवीर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणे माघारी परतले.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात करुणारत्नेने पुजाराला पायचित केलं. पुजाराने 133 धावा केल्या. तर रहाणेला डिकवेलाने 132 धावांवर यष्टीचित केलं.
पुजारा आणि अजिंक्य रहाणेनेने कालच्या 3 बाद 344 धावांवरुन भारताच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र पुजारा आपल्या कालच्या 128 धावांमध्ये 5 धावांची भर घालून माघारी परतला. पुजारा - रहाणेने चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागीदारी केली.
दुसरीकडे अजिंक्य रहाणेने टिच्चून फलंदाजी करत, धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. रहाणेने कालच्या नाबाद 103 धावांवरुन दीडशतकाकडे वाटचाल सुरु केली होती, मात्र पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात, रहाणे फसला. पुष्पकुमाराने त्याला चकवलं आणि डिकवेलाने त्याला यष्टीचित केलं.
तत्पूर्वी रहाणेने प्रमोशन मिळालेल्या अश्विनसोबत पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी रचली.
पहिल्या दिवसाचा खेळ
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या खणखणीत नाबाद शतकांच्या जोरावार, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 344 धावा केल्या.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनं झळकावलेल्या शतकांनी कोलंबो कसोटीत भारतीय डावाला पुन्हा मजबुती दिली. पुजारा आणि रहाणेनं वैयक्तिक शतकं झळकावताना, चौथ्या विकेटसाठी 211 धावांची अभेद्य भागीदारीही रचली. त्यामुळंच या कसोटीत टीम इंडियानं तीन बाद 133 धावांवरून, पहिल्या दिवसअखेर तीन बाद 344 अशी भक्कम स्थितीत मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी, चेतेश्वर पुजारा 128 आणि अजिंक्य रहाणे 103 धावांवर खेळत होता.
सलामीच्या लोकेश राहुलनं झळकावलेल्या अर्धशतकानं भारताला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 101 अशी दमदार सुरुवात करून दिली होती. पण उपाहारानंतर भारताची तीन बाद 133 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत पुजारा आणि रहाणेनं भारतीय डावाची सूत्रं आपल्या हाती घेतली आणि पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाला तीन बाद 344 धावांची मजल मारून दिली. कोलंबो कसोटीचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला.
चेतेश्वर पुजारानं त्याच्या कारकीर्दीतलं तेरावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 225 चेंडूंत दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 128 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेनं नववं कसोटी शतक साजरं केलं. त्यानं 168 चेंडूंत बारा चौकारांसह नाबाद 103 धावांची खेळी उभारली. सलामीच्या लोकेश राहुलनं 82 चेंडूंत सात चौकारांसह 57 धावा फटकावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement