India vs South Africa 2nd Test 2024 : 13 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेवर पलटवार; मालिका वाचवण्यासाठी रोहित धोनीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार?
तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा तत्कालीन कर्णधार धोनीच्या पराक्रमाची बरोबरी करू शकतो का, हे पाहावे लागेल.
India vs South Africa 2nd Test 2024 : सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. रोहित ब्रिगेडचा एक डाव आणि 32 धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने आत्मसमर्पण केले. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना होता. आता टीम इंडिया 3 जानेवारीला केपटाऊनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. तीन दशकांहून अधिक इतिहासात, भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाची कसोटी सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी 2010-2011 च्या मालिकेत झाली. त्यावेळी तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. त्या दौऱ्यात महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा कर्णधार होता.
या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जिंकला होता. 16-20 डिसेंबर 2010 दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात टीम इंडिया पहिल्या डावात 136 धावांवर बाद झाली होती, त्यानंतर आफ्रिकन संघाने पहिल्या डावात 620/4 अशी डोंगरी धावसंख्या करून घोषित केले. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या इनिंगमध्ये 459 रन्सवर ऑलआऊट झाली.
पहिली कसोटी गमावूनही मालिका बरोबरीत सोडवली
त्यानंतर टीम इंडिया मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी डर्बनला पोहोचली. दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून (बॉक्सिंग डे) सुरू झाला. आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 205 रन्सवर ऑलआऊट झाली होती. डेल स्टेनने 6 विकेट घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 131 धावांवर गारद झाला. झहीर खान (3), इशांत शर्मा (1), एस श्रीशांत (3), हरभजन सिंग (2) यांनी मिळून आफ्रिकन संघाचा पराभव केला. यानंतर टीम इंडियावर पुन्हा दुसऱ्या डावात खेळण्याची पाळी आली, त्यानंतर वीरेंद्र सेहवाग (32) आणि मुरली विजय (9) यांनी 42 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर टीम इंडियाच्या एकामागून एक विकेट पडू लागल्या. पण व्हीव्हीएस लक्ष्मणने पहिल्या डावात 96 धावा केल्या आणि टीम इंडियाचा डाव 228 धावांवर संपुष्टात आला.
आता दक्षिण आफ्रिकेसमोर 303 धावांचे लक्ष्य होते. आफ्रिकन संघाच्या वतीने कर्णधार ग्रॅमी स्मिथ (37) आणि अल्विरो प्रिन्स (26) यांनी 12.1 षटकात 63 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाचा तणाव वाढत होता. यानंतर आफ्रिकन संघाच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या आणि टीम इंडियाने आफ्रिकन संघाला 215 धावांत आटोपले. अशा प्रकारे टीम इंडियाने हा सामना 87 धावांनी जिंकला.
अशाप्रकारे टीम इंडियाने मालिकेत 1-1अशी बरोबरी साधली होती. मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनमध्ये (2-6 जानेवारी 2011) झाला, जो अनिर्णित राहिला. म्हणजेच तब्बल 13 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला ही मालिका 1-1 अशी बरोबरीत ठेवण्याची संधी आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा तत्कालीन कर्णधार धोनीच्या पराक्रमाची बरोबरी करू शकतो का, हे पाहावे लागेल.
1992 मध्ये टीम इंडिया पहिल्यांदा आफ्रिकेविरुद्ध आफ्रिकेत कसोटी खेळली
1992 मध्ये टीम इंडियाने प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळला होता. त्या मालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळले गेले, 3 सामने अनिर्णित राहिले, 1 सामना आफ्रिकन संघाने जिंकला. ही मालिका आफ्रिकन संघाकडे 1-0 अशी गेली. तेव्हापासून टीम इंडियाने 8 वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. पण टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची संधी कधीच मिळाली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या