एक्स्प्लोर
'पाकिस्तान जिंदाबाद'ला भारतीयांचं 'गणपती बाप्पा मोरया'ने उत्तर
दुबईतील स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये रंगलेली अनोखी जुगलबंदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते आसुसलेले असतात. आशिया चषकात बुधवारी रंगलेल्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मात्र दुबईतील स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये रंगलेली अनोखी जुगलबंदी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. भारत आणि पाकिस्तानी संघाचे क्रिकेटपटू मैदानावर एकमेकांना भिडत असतानाच स्टेडियममधील प्रेक्षकांमध्येही चढाओढ सुरु होती. पाक चाहत्यांनी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या दिलेल्या घोषणांना भारतीय रसिकांनीही तोडीस तोड उत्तर दिलं. गणेशोत्सव सुरु असल्यामुळे भारतीय प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष केला. दुबईत झालेल्या सामन्याचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही. मैदानावरील प्रेक्षकांच्या स्टॅण्डमध्येच या व्हिडिओचं शूट झाल्याचं दिसत आहे. तीन-चार वेळा 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या भारतीय प्रेक्षकांच्या स्टॅण्डमधून चक्क 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष होताना ऐकू आला. जगभरात भारतीयांचं वास्तव्य असल्याने दुबईतील स्टेडिअममध्ये 'बाप्पा'चा जयघोष दुमदुमल्याचं आश्चर्य वाटत नाही. भारत आणि पाकिस्तान हा सामना संपून कित्येक तास उलटले, तरी सोशल मीडियावरील चर्चा काही थांबलेली नाही. पाकिस्तानी संघाला ट्रोल करण्यापासून अभिनंदानाच्या पोस्ट अजूनही सुरुच आहेत. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा























