Mirabai Chanu Wins Medal: टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू कोण आहे?
मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून भारताचे नाव उज्वल केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
सैखोम मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये तिने भारतासाठी पहिले रौप्यपदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलोग्राम महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले असून यासह भारत ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदकाच्या बाबतीत आपले खाते उघडण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, चीनच्या जजिहूने वेटलिफ्टिंगच्या 49 किलो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
कोण आहे मीराबाई चानू?
मणिपूरची राजधानी इम्फाल येथे राहणारी मीराबाई चानूचा जन्म 8 ऑगस्ट 1994 रोजी इम्फाळ येथे झाला. 26 वर्षांची मीराबाई चानूला लहानपणापासूनच तिरंदाजीची आवड होती आणि तिला त्यामध्ये करिअर करण्याची इच्छा देखील होती. पण आठवीनंतर तिचा कल वेटलिफ्टिंगकडे वळला आणि यातच पुढे जाण्याचा तिने निर्णय घेतला. खरं तर, इम्फालच्या वेटलिफ्टर कुंजराणीला प्रेरणा मानून चानूनेही वेटलिफ्टिंगमध्ये रस घ्यायला सुरुवात केली.
वयाच्या 11 व्या वर्षी चानूने स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले. नंतर, तिने आंतरराष्ट्रीय आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेत भाग घेऊन आपल्या वेटलिफ्टिंगच्या कारकीर्दीला सुरूवात केली, जिथे तिने दोन्ही पदके जिंकली.
बर्याच संघर्षानंतर मीरा चानूला मिळालं यश
मणिपूरच्या मीराबाई चानूने आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने यापूर्वी अनेकवेळा आपल्या क्षमतेच्या जोरावर देशाचं नाव उंच केलं आहे. मात्र, इतपर्यंत पोहचणं इतकं सोपं नव्हतं. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. आज तिने जी उंची गाठली आहे. या संपूर्ण प्रवासादरम्यान चानूला आपल्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही तिच्या आईवडिलांनी तिची प्रत्येक गरज पूर्ण केली. त्याचाच परिणाम म्हणजे चानू सतत तिच्या कुटुंबाचे व देशाचे नाव उज्वल करत आहे.
मीराबाई चानूने यापूर्वीही अनेक पदके जिंकली आहेत
मीराबाई चानूने आतापर्यंत देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. 2014 साली तिने ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता सामन्यात चानूने वेटलिफ्टर कुंजाराणीचा पराभव करून रिओ ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निर्माण केले. 2017 वर्ल्ड वेटलिफ्टिंग चँपियनशिपमध्ये मीराबाईने 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. त्याच वेळी चानूने 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले. एप्रिल 2021 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेदरम्यान मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजनाच्या गटात 119 किलो वजन उंचावून नवीन विश्वविक्रम केला. दुसरीकडे चानूला स्नेचमधील खराब कामगिरीमुळे आशियाई सामन्यात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.