(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुवाहाटी वनडे : विराट-रोहितनं साजरं केलं शतक
विराटचं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतलं हे 36 वं शतक ठरलं आहे. तर रोहितचं हे कारकिर्दितलं 20वं शतक ठरलं.
गुवाहाटी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने शतक ठोकलं आहे. विराटनं या सामन्यात 88 चेंडूंचा सामना करताना शतकाला गवसणी घातली आहे. या खेळीत विराटनं 17 चौकार ठोकले.
विराटचं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीतलं हे 36 वं शतक ठरलं आहे. तर विराटच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या आता 60 वर जाऊन पोहोचली आहे.
रोहितनं 84 चेंडूत आपलं शतक साजरं केलं. रोहितचं हे कारकिर्दितलं 20वं शतक ठरलं. दुसऱ्या विकेटसाठी विराट आणि रोहितनं 246 धावांची भागिदारी केली.
विराटच्या शतकाचं वैशिष्ट्य
- विराटचं हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दितलं 36 वं शतक आहे - लक्ष्याचा पाठलाग करतानाचं 22वं शतक आहे. - मायदेशातील पंधरावं शतक आहे. - कर्णधार म्हणून चौदावं शतक आहे. विराट पॉटिंगनंतर सर्वाधिक शतक ठोकणार कर्णधार आहे. पॉटिंगने कर्णधार म्हणून 22 शतक ठोकली आहेत. - वेस्टइंडिज विरुद्धचं पाचवं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधित शतक ठोकणार तो भारतीय खेळाडू ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं भारतासमोर 323 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजनं दमदार फलंदाजी करताना मर्यादित 50 षटकांत आठ बाद 322 धावा केल्या.
विंडीजचा मधल्या फळीतील फलंदाज शिमरॉन हेतमायरनं आपल्या कारकीर्दीतलं तिसरं शतक साजरं केलं. त्याने 78 चेंडूत सहा चौकार आणि सहा षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. सलामीवीर कायरन पॉवेलनही 39 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 51 धावांचं योगदान दिलं.