(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामन्याकडे लक्ष, एकमेकांसमोर कसं आहे दोन्ही संघाचं रेकॉर्ड?
IND vs NZ : टी20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय टीम दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागली आहे.
IND vs NZ : टी20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला. आता भारतीय टीम दुसऱ्या सामन्याच्या तयारीला लागली आहे. 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरोधात हा सामना होणार आहे. हा सामना देखील दुबईच्याच स्टेडियमवर होईल जिथं भारताचा पहिला सामना झाला होता. भारताला पाकिस्ताननं पहिल्या सामन्यात इथंच पराभूत केलं होतं. आता न्यूझीलंडकडूनही इथं मोठं आव्हान आहे. भारताला हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. या सामन्यात जर पराभव झाला तर भारताची पुढील वाटचाल खडतर असेल. दुसरीकडे काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा देखील पाकिस्ताननं पराभव केला आहे. त्यामुळं न्यूझीलंड देखील हा सामना जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे.
Pakistan vs New Zealand: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर 5 विकेट्सने विजय, भारताला फायदा की तोटा?
भारतीय संघ आणि न्यूझीलंड 16 टी20 इंटरनेशनल सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यातील आठ-आठ सामने दोन्ही संघानं जिंकले आहेत. याचा अर्थ दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. टी20 विश्वचषकात दोन सामने दोन्ही संघात झाले असून दोन्ही सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. त्यामुळं न्यूझीलंडचं पारडं जड असणार आहे. 2019 च्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियाला पराभूत केलं होतं. यंदाच्या विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये देखील न्यूझीलंडच्या संघानं भारताला हरवलं आहे.
सध्याच्या विश्वचषकात मात्र दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आहे. काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं न्यूझीलंडला पाच विकेट्सने हरवलं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. न्यूझीलंडने 20 षटकात 8 विकेट्स गमावून 134 धावा केल्या. न्यूझीलंडने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 19 व्या षटकात पूर्ण केले. या विजयासह पाकिस्तानच्या संघाचे एकूण 4 गुण झाले आहेत. विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीत भारतीय संघ 'ब' गटात आहे. दरम्यान, न्यूझीलंडला पराभूत करून पाकिस्तान 'ब' गटाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याआधी पाकिस्ताननं भारताचा दहा विकेट्सने पराभव केला होता. ब गटात अफगाणिस्तान आणि नामिबिया संघानं देखील एक-एक विजय मिळवत प्रत्येकी दोन गुण मिळवले आहेत.