IND vs ENG : रोमांचक सामन्यात झाले 'हे' भन्नाट विक्रम, सूर्यकुमारचा तर नादच खुळा!
IND vs ENG 4th T20: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल खेळल्या गेलेल्या चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला.या रोमांचक सामन्यात काही विक्रम झालेले देखील पाहायला मिळाले.
IND vs ENG 4th T20: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल खेळल्या गेलेल्या चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा आठ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. आता मालिका विजयासाठीचा अंतिम सामना उद्या, 20 मार्च रोजी खेळला जाणार आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले होते. भारताने 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 185 धावांचं लक्ष्य उभारलं होतं. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडला निर्धारित 20 षटकांत आठ बाद 177 धावांवरपर्यंतचं मजल मारता आली. या रोमांचक सामन्यात काही विक्रम झालेले देखील पाहायला मिळाले.
टी20 मध्ये विराट पहिल्यांदाच झाला स्टम्पिंग आऊट
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली पाच चेंडूत एक धाव बनवून बाद झाला. आदिल रशीदनं त्याला स्टंप आऊट केलं. कोहली टी20 च्या आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदा स्टम्पिंग आऊट झाला.
IND vs ENG 4th T20: चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी पराभव, मालिकेत 2-2 अशी बरोबरी, आता निर्णायक सामना 20 मार्चला
रोहित शर्मानं पूर्ण केल्या 9 हजार धावा
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानं या सामन्यात केवळ 12 धावा केल्या. मात्र तरीही त्यानं एक अनोखा विक्रम केला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये 9 हजार धावा त्यानं पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज आहे. आंतराराष्ट्रीय टी 20 तसेच आयपीएल टी 20 असं मिळून 342 सामन्यात त्यानं 133.3 च्या स्ट्राइक रेटनं 9,001 धावा केल्यात. याआधी विराटनं देखील 9 हजार धावा पूर्ण केल्यात.
सूर्यकुमार यादवच्या नावे हे विक्रम
कालच्या सामन्याचा हिरो असलेल्या सूर्यकुमार यादवनं आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा क्रिकेटर ठरला आहे. त्यानं आपल्या पहिल्या इनिंगमध्ये 57 धावा केल्या. पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक ठोकणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटर बनला आहे. त्याच्याआधी अजिंक्य रहाणे, ईशान किशन, रोहित शर्मा आणि रॉबिन उथप्पानं ही कामगिरी केली आहे.