ICC world cup 2019 | बांगलादेशची दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी मात, आफ्रिकेचा सलग दुसरा पराभव
बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवलेली सहा बाद 330 ही धावसंख्या त्यांच्या विश्वचषक इतिहासातली सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसननं बांगलादेशला दुसऱ्यांदा विश्वचषकात त्रिशतकी मजल मारुन दिली.
लंडन : बांगलादेशने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला. तर दक्षिण आफ्रिकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेसमोर 331 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला आठ बाद 309 धावांचीच मजल मारता आली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसीची 62 धावांची खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. आफ्रिकेकडून एडन मार्क्रम 45, ड्युमिनी 45, रॅसी ड्यूसन 41 धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रेहमाननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तर सैफुद्दीननं दोन विकेट्स घेऊन बांगलादेशच्या विजयात मोठं योगदान दिलं.
त्याआधी, मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसनच्या अर्धशतकांमुळे बांगलादेशनं यंदाच्या विश्वचषक मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा बाद 330 धावांचा डोंगर उभारला. सलामीच्या सौम्या सरकार आणि तमिम इक्बालनं बांगलादेशला 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर मुशफिकुर रहीम आणि शाकिबनं खेळाची सूत्रं आपल्या हातात घेत दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं.
या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शाकिबनं 84 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह 75 धावांची खेळी साकारली. तर मुशफिकुरनं 80 चेंडूत आठ चौकारांसह 78 धावांचं योगदान दिलं.
विश्वचषकातील बांगलादेशची सर्वाधिक धावसंख्या
बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवलेली सहा बाद 330 ही धावसंख्या त्यांच्या विश्वचषक इतिहासातली सर्वाधिक धावसंख्या ठरली. मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसननं बांगलादेशला दुसऱ्यांदा विश्वचषकात त्रिशतकी मजल मारुन दिली. याआधी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशनं स्कॉटलँडविरुद्ध चार बाद 322 धावांचा डोंगर उभारला होता. आज इंग्लंडमधल्या केनिंग्टन ओव्हलवर बांगलादेशनं स्वत:चाच तो विक्रम मागे टाकला.