Team India Slips to number 3: आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल (ICC)च्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाची पिछेहाट झाली असून मोठा झटका बसला आहे.  दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया क्रमवारीत नंबर एकवरुन खाली घसरली आहे. आता टीम इंडिया तिसऱ्या स्थानी आहे.  टीम इंडियाचे आता 116 गुण असून एक नंबरवरुन तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर अॅशेजमध्ये जोरदार कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रमवारीत नंबर वन झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे आता 119 गुण आहेत.  


टीम इंडियानं आफ्रिकेविरुद्ध सेंचुरियनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर जोहान्सबर्ग आणि केपटाउनमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळं टीम इंडियाचं दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळालं.  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर विराट कोहलीनं कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टी 20 मधील कर्णधारपदाचाही त्यानं राजीनामा दिलाय.  






दुसरीकडे आफ्रिका संघाला भारताविरुद्ध कसोटी मालिका विजयाचा फायदा झाला आहे. आफ्रिकन संघ क्रमवारीत पाचव्या नंबरवर आहे. तर या यादीत न्यूझीलंडचा संघ आता दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडनं बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका 1-1नं बरोबरीत रोखली होती. 


पाकिस्तानला देखील एका स्थानाचा फटका बसला आहे. पाकिस्तान सहाव्या स्थानावर पोहोचला आहे तर श्रीलंका सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या, बांग्लादेश नवव्या आणि झिम्बॉब्वे दहाव्या स्थानावर आहे. 


भारतीय संघ आता फेब्रुवारी-मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दोन सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे.  


मुंबई कसोटीत न्यूझीलंडला नमवत भारत झाला होता नंबर वन 


मागील वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या कसोटी विजयानंतर भारतीय संघ कसोटीत नंबर वनवर गेला होता. न्यूझीलंडकडून नंबर एकचा खिताब टीम इंडियानं घेतला होता. न्यूझीलंडची टीम जून 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप किताब जिंकून नंबर वनवर पोहोचली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या