Under-19 World Cup: अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे. काल देखील भारतीय संघानं आयर्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी करत त्यांचा पराभव केला. मात्र त्याआधी संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण अंडर 19 भारतीय संघाचा कर्णधार यश धूलसह (Yash Dhull) पाच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. 


भारताचा अंडर-19 कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, आराध्य यादव, वासू वत्स, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळं त्यांना बुधवारी आयर्लंड विरुद्ध गट ब विश्वचषक सामन्यातून बाहेर पडावे लागले. 


बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, तीन भारतीय खेळाडूंची कोरोना चाचणी आधी पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांना आधीच वेगळे करण्यात आले होते. सामन्यापूर्वी आमच्या कर्णधार आणि उपकर्णधाराचीही रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटीव्ह आली.  त्यामुळे त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून संघाच्या बाहेर ठेवलं. 


कर्णधार धुल आणि रशीद दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या  सामन्यात सहभागी झाले होते. यात धूलनं चांगली कामगिरी केली होती. काल यश धूलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूने संघाचे नेतृत्व केले. आता धुलच्या अनुपस्थितीत संघ शनिवारी युगांडाशी खेळणार आहे. आता आमच्याकडे केवळ 11 खेळाडू उपलब्ध आहेत, असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. 


अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अंडर 19 नं  दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं होतं. या विजयामध्ये कर्णधार यश धुलनं चांगली कामगिरी केली होती. यशच्या 82 धावांच्या बळावर भारताना 232 धावा केल्या होत्या. काल यशसह अन्य पाच खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघानं आयर्लंडचा तब्बल 174 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतानं रघुवंशी आणि हरनूर सिंहच्या अर्धशतकांच्या बळावर 307 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ अवघ्या 133 धावांमध्ये गुंडाळला.



हे देखील वाचा-