Britain Covid19 Update : जगभरात एकीकडे कोरोनाच्या वाढता संसर्ग पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे ब्रिटन सरकारने कोरोना निर्बंध हटवले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson ) यांनी बुधवारी देशात मास्क परिधान करण्यासह इतर निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे. जॉन्सन म्हणाले की, आमच्या शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आधीच उच्चांक गाठला आहे. त्यामुळे कोरोना निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत, आता कोविड निर्बंध उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


जॉन्सन यांनी सांगितले की, देशातील ओमायक्रॉनची परिस्थिती पाहता अनेक निर्बंध शिथिल केल्यानंतर ब्रिटनमधील लोकांना यापुढे घरून काम (Work From Home) करण्यास सांगितले जाणार नाही. तसेच, मास्कचा अनिवार्य वापर करण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे. आता लोक मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरू शकतात. यासोबतच, लवकरच शालेय वर्गातही मास्क घालण्याच्या नियम हटवण्यात आले आहेत.


दरम्यान, जगात नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार, 30.17 लाख लोकांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. तर 8,039 लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील असा इशारा दिला होता की, ओमायक्रॉन व्हेरियंटला हलक्यात न घेणेच शहाणपणाचे आहे. कोरोनाचे इतर प्रकार देखील येऊ शकतात, त्यामुळे सर्व सर्व देशांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.


जॉन्सन यांनी संसदेत सांगितले की, "ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की ओमायक्रॉन व्हेरियंटने देशात जवळपास उच्चांक गाठला आहे, त्यानंतर आता कोविड निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात. म्हणून, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की बूस्टर डोसची मोहीम आणि सावधगिरीच्या उपायांना मिळालेला जनतेचा प्रतिसाद पाहता, पुढील आठवड्यापासून निर्बंध शिथिल केले जाऊ शकतात."


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha