एक्स्प्लोर
हर्षा भोगले सध्या कुठे आहेत?

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या कॉमेंट्री बॉक्समधून गायब असलेले मराठमोळे हर्षा भोगले हे पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या आगामी दहाव्या मोसमात, ते कॉमेंट्री करताना दिसतील, अशी चर्चा आहे. मात्र सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या माहितीनुसार, हर्षा भोगले कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसो अथवा न दिसो, ते मॅचच्या सुरुवातीला आणि शेवटी 'एक्स्ट्र इनिंग्स' या शोच्या निमित्ताने स्टुडिओमध्ये जरुर पाहायला मिळतील. जर आयपीएलमध्ये हर्षा भोगले दिसले तर त्यांचं वर्षभरानंतर कमबॅक असेल. भोगले यांनी कॉमेंट्रीदरम्यान केलेलं वक्तव्य टीम इंडियातील काही खेळाडू आणि बीसीसीआयमधील सदस्यांना आवडलं नव्हतं. त्यामुळे त्यांना कॉमेंट्री करण्यापासून रोखलं होतं. सोनी स्पोर्ट्सचे भारतातील कार्यकारी उपाध्यक्ष प्रसन्न कृष्णन यांच्या मते, "आम्ही यापूर्वीही हर्षा भोगलेंसोबत काम केलं आहे. ते बीसीसीआयच्या कॉमेंट्री टीमसोबत काम करत होते. गेल्या वर्षी ते नव्हते, मात्र त्यापूर्वी ते बीसीसीआयसोबत होते." मॅच जिथे असेल तिथून मुख्य इंग्रजी कॉमेंट्री होईल. अन्य भाषा आणि एक्स्ट्रा इनिंग्स या शोसाठी आम्ही स्टुडिओतून वेगळं प्रसारण करु. त्यामुळे प्रवास, साहित्य आणि वेगवेगळी ठिकाणांमुळे एकाच व्यक्तीला सर्वच कामं करणं शक्य नाही, असंही प्रसन्न कृष्णन यांनी सांगितलं. हर्षा भोगले लवकरच कॉमेंट्री बॉक्समध्ये पुनरागमन करतील, असा विश्वासही कृष्णन यांनी व्यक्त केला. हर्षा भोगलेंचा ट्विटर वाद हर्षा भोगले यांनी गेल्या वर्षी भारतीय संघावर टीका केली होती. त्यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी भोगलेंवर निशाणा साधला होता. बच्चन यांनी ट्विट करुन भोगलेंना रिप्लाय दिला होता. तेच ट्विट धोनीने रिट्विट केलं होतं. इतकंच नाही तर विराट कोहली आणि मुरली विजय यांनी भोगले यांची बीसीसीआयकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयपीएल 9 च्या शेवटच्या सत्रात हर्षा भोगले यांना कॉमेंट्री करण्यापासून रोखलं होतं. https://twitter.com/SrBachchan/status/712721409420578816 https://twitter.com/msdhoni/status/712721914062458880 यावर मग हर्षा भोगले यांनी फेसबुकवर स्पष्टीकरण दिलं होतं.
आणखी वाचा























