पोलंड येथील युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नागपुरच्या आल्फियाला सुवर्ण
गुरुवार हा भारतीय बॉक्सिंगसाठी अत्यंत महत्वाचा ठरला कारण युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सने 7 सुवर्णपदके मिळवली आणि ह्यात शेवटचा सामना जिंकला.
नागपूर : क्या है? मार पिट ही तो करनी है ना? असं म्हणत 13 वर्षीय आल्फिया तरन्नुम अक्रम खान पठाणने 4 वर्ष आधी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. आज वयाच्या 18 व्या वर्षी पोलंड येथे युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल मिळवत देशाची आणि महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
गुरुवार हा भारतीय बॉक्सिंगसाठी अत्यंत महत्वाचा ठरला कारण युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सने 7 सुवर्णपदके मिळवली आणि ह्यात शेवटचा सामना जिंकला. नागपूरच्या आल्फियाने मोल्दोवाच्या दारिया कोझोरेझला हरवले होते. नागपूरच्या एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी आल्फिया. कधी बॉक्सिंग शिकेल असे वाटलेही नव्हते. भाऊ बॉक्सिंग शिकायचा म्हणून आल्फिया ही फिटनेससाठी बॅडमिंटन खेळायला जायची. पण भावाचे कोच गणेश पुरोहित ह्यांनी तिला बॉक्सिंग शिक असे म्हटलं, पण वडील मुलीने बॉक्सिंगसारखा खेळ खेळावा ह्यासाठी तयार नव्हते. जे शिकायला इतरांना 7 ते 8 दिवस लागायचे, ते आल्फीया एक किंवा दोन दिवसात शिकत होती. जणू काही बॉक्सिंग करायलाच तिने जन्म घेतला. एका नंतर एक सामने जिंकू लागली आणि खेलो इंडिया खेलोमधून हरियाणाच्या राष्ट्रीय अकॅडमीत पोहचली. ह्या दरम्यान बॉक्सिंगसाठी बऱ्याच गोष्टी जसे की दहावीचे दोन पेपर सोडावे लागले. परिवाराची साथ महत्वाची होती.
बॉक्सिंगच्या विश्वात आपले आणि देशाचे नाव करत सोमवारी आल्फिया भारतात परतणार आहे. जर हा काळ कोविडचा नसता, तर नक्कीच नागरी सत्कारासाठी नागपूर शहर तयार असते.