गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती
टीम इंडियाच्या 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजयांचा गंभीर हा एक प्रमुख शिल्पकार ठरला होता.मात्र पुढच्या काळातही खेळत राहण्याची उमेद संपल्यानेच आपण निवृत्तीचा विचार केल्याची भावना गंभीरनं व्यक्त केली आहे.

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी या तिन्ही फॉरमॅट्समधील यशस्वी फलंदाज गौतम गंभीरनं क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढच्या काळातही खेळत राहण्याची उमेद संपल्यानेच आपण निवृत्तीचा विचार केल्याची भावना गंभीरनं व्यक्त केली आहे.
टीम इंडियाच्या 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी आणि 2011 सालच्या वन डे विश्वचषक विजयांचा गंभीर हा एक प्रमुख शिल्पकार ठरला होता. गंभीरने दोन्ही विश्वचषकांच्या फायनल्समध्ये निर्णायक खेळी केली होती. 2009 सालच्या न्यूझीलंड दौऱ्यात गंभीरनं तब्बल पावणेअकरा तास फलंदाजी करून नेपियर कसोटी अनिर्णीत राखली होती.
गौतम गंभीरनं 2003 साली ढाक्यात बांगलादेशशी खेळून वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2004 सालच्या नोव्हेंबर महिन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत कसोटी पदार्पण साजरं केलं. गंभीरनं आज वयाच्या 37 व्या वर्षी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समधून निवृत्ती स्वीकारली आहे.
गौतम गंभीरची कारकिर्द
गंभीरने आजवरच्या कारकीर्दीत 37 कसोटी सामन्यांमध्ये 41.95 च्या सरासरीनं 4154 धावा केल्या आहेत. त्यात 9 शतकं आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. गंभीरच्या खात्यात 147 वन डे सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीनं 5238 धावा आहेत. त्यात 11 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गंभीरनं 37 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 27.41 च्या सरासरीनं 932 धावा फटकावल्या आहेत. त्यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे.























