(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिल्ली कॅपिटल्सकडून कोलकाता नाईट रायडर्सचा सुपरओव्हरमध्ये पराभव, पृथ्वी शॉचं शतक एका धावेनं हुकलं
सुपरओव्हरमध्ये दिल्लीनं दिलेल्या 11 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कगिसो रबाडाच्या प्रभावी माऱ्यामुळे कोलकात्याला केवळ सात धावाच करता आल्या.
दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा सुपरओव्हरमध्ये पराभव करुन यंदाच्या मोसमातला दुसरा विजय साजरा केला. या सामन्यात कोलकात्यानं दिल्लीसमोर विजयासाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण कोलकात्याच्या अचूक माऱ्यासमोर दिल्लीला 20 षटकांत 185 धावांचीच मजल मारता आली. त्यानंतर खेळवण्यात आलेल्या सुपरओव्हरमध्ये दिल्लीनं दिलेल्या 11 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, कगिसो रबाडाच्या प्रभावी माऱ्यामुळे कोलकात्याला केवळ सात धावाच करता आल्या.
त्याआधी आंद्रे रसेल आणि कर्णधार दिनेश कार्तिकनं रचलेल्या 95 धावांच्या भागिदारीमुळे कोलकात्यानं 20 षटकांत आठ बाद 185 धावांची मजल मारली. दिल्लीच्या प्रभावी माऱ्यासमोर कोलकात्याची एकवेळ पाच बाद 61 अशी दाणादाण उडाली होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेलनं कोलकात्याच्या डावाला आकार दिला. कार्तिकनं 36 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह 50 धावा फटकावल्या. तर रसेलनं 28 चेंडूत चार चौकार आणि तब्बल सहा षटकार ठोकत 62 धावांची खेळी केली.
दरम्यान दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉचं पहिलंवहिलं आयपीएल शतक अवघ्या एका धावेनं हुकलं. पण दिल्लीच्या विजयात पृथ्वीची ही खेळी महत्वाची ठरली. पृथ्वीनं सलामीला येतं 55 चेंडूत 99 धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीत 12 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. त्यानं कर्णधार श्रेयस अय्यरसह दुसऱ्या विकेटसाठी 89 धावांची तर रिषभ पंतसह तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचली.