Commonwealth Games 2022: भारतीय पुरुष हॉकी संघ आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघ (India Men's Hockey Team vs Australia Hockey Team)  यांच्यात आज कॉमनवेल्थ 2022 स्पर्धेतील (Commonwealth Games 2022)  अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामाना जिंकणारा संघ सुवर्णपदाकवर नाव कोरेलं. महत्वाचं म्हणजे, कॉमनवेल्थ हॉकी स्पर्धेत प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियाच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे. यामुळं भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं मोठं आव्हान असणार आहे. तसेच या संपू्र्ण स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचं विजयी रथ रोखणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


कॉमनवेल्थ हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
दरम्यान, 1988 मध्ये पहिल्यांदाच हॉकी खेळाचा कॉमनवेल्थ स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत कॉमनवेल्थ स्पर्धेत हॉकीच्या सहा स्पर्धा पार पडल्या आहेत. या सर्व स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदक जिंकलंय. 2010 आणि 2014 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली होती. परंतु, शेवटी ऑस्ट्रेलियानं विजय मिळवत आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. 


ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची आकडेवारी
भारताला गेल्या वर्षी टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा पराभव स्वीकारावा लागला होता. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकता भारतीय हॉकी संघ ऑस्ट्रेलियासमोर डगमताना दिसला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 129 सामने खेळण्यात आले. यातील 86 सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवलाय. तर, भारताला फक्त 23 सामन्यात यश मिळालंय. तर, 20 सामने अनिर्णित ठरले आहेत. 


कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारताचा प्रवास
यापूर्वीच्या आकडेवारी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं झुकलेले दिसत असताना सध्याचा भारतीय हॉकी संघामध्ये उत्कृष्ट खेळाडू आहेत. तसेच भारतीय हॉकी संघ चांगल्या फॉर्ममध्येही दिसत आहेत. भारतानं आपल्या गटातील चार पैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक दिलीय. भारतानं वेल्स, कॅनडा आणि घानाविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवलाय. तर, इग्लंडविरुद्ध सामना अनिर्णित ठरलाय. त्यानंतर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 3-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कुठे पाहणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघाचा हा महत्त्वाचा सामना आज (8 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर तुम्ही हा सामना पाहू शकता. सोनी लिव अॅपवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.


हे देखील वाचा-