India in Olympics : जगातील विविध क्रिडा प्रकारांची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक खेळ (Olympics Games). अत्यंत मानाच्या या स्पर्धांमधील सुवर्णपदक म्हणजे कोणत्याही खेळाडूचा तसंच त्याच्या देशाचा सर्वात मोठा सन्मान असतो. अशा या ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताचा क्रमांक अव्वल नसला तरी भारताची एक आपली वेगळी ओळख आहे. ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकी स्पर्धेवर अधिराज्य गाजवलेल्या भारताने यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्येही दमदार कामगिरी केली. विशेष म्हणजे भारत 1947 स्वातंत्र्य झाला (India Independence) असला तरी 1900 सालापासून ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभाग घेत आहे. 1900 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला असताना भारताकडून खेळणाऱ्या ब्रिटीश इंडियन नॉर्मन प्रिचर्ड यांनी  अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदकंही जिंकली होती त्यामुळे भारत हा ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला आशियाई देश बनला. तर भारताच्या अशाच ऑलिम्पिक इतिहासावर एक नजर फिरवू...


भारताने 1900 साली नॉर्मन यांच्या मदतीने पदकं जिंकल्यावर 1920 साली प्रथमच ऑलिम्पिक खेळांसाठी आपला स्वतंत्र संघ पाठवला आणि तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिक खेळांमध्ये भारत सातत्याने भाग घेत आहे. भारताने आतापर्यंत ऑलम्पिकमध्ये (India in Olympics) एकूण 35 पदकांवर नाव कोरलं आहे. यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत भारत 58 व्या क्रमांकावर आहे. दरम्यान या पदकांचा विचार करता भारतीय पुरुष फील्ड हॉकी संघाने सर्वाधिक गोल्ड अर्थात सुवर्ण पदकं मिळवून दिली आहे. अगदी सुरुवातीपासून ऑलिम्पिक स्पर्धेत भारत हॉकीमध्ये वर्चस्व गाजवत होता, भारताने 1928 ते 1980 दरम्यान 12 ऑलिम्पिकमध्ये 11 पदके जिंकली होती. ज्यामध्ये तब्बल 8 सुवर्ण पदकांचा समावेश होता ज्यापैकी सहा पदकंतर 1928 ते 1956 पर्यंत सलग भारताने जिंकली होती. 


1920 मध्ये 5 खेळाडूंसह भारत ऑलिम्पिकमध्ये


1947 पर्यंत भारतात ब्रिटीश राजवट होती. पण तरीही भारताने ऑलिम्पिक खेळांमध्ये ब्रिटीश ऑलिम्पिक संघापासून वेगळा भाग घेतला होता. 1900 साली नॉर्मन यांच्या मदतीने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारताने 1920 मध्ये ऑलिम्पिकमध्ये स्वत:चा संघ पाठवला. ज्यात तीन खेळाडू, दोन कुस्तीपटू आणि व्यवस्थापक सोहराब भूत आणि ए.एच.ए. फिझी यांचा समावेश होता. त्यानंतर 1920 च्या दशकात भारतीय ऑलिम्पिक चळवळीची स्थापना झाली. या चळवळीचे काही संस्थापक दोराबजी टाटा, ए.जी. नोहेरेन, एच.सी. बक, मोइनुल हक, एस. भूत, ए.एस. भागवत यांच्यासह प्रमुख संरक्षकांमध्ये महाराजा आणि राजेशाही राजपुत्र जसे की पटियालाचे भूपिंदर सिंग, नवानगरचे रणजितसिंहजी, कपूरथलाचे महाराज आणि बर्दवानचे महाराज यांचा समावेश होता. 1923 मध्ये भारताने अखिल भारतीय ऑलिम्पिक समिती देखील स्थापन केली.


ऑलम्पिकमध्ये हॉकीची जादू


ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताची सर्वात जमेची बाजू म्हटलं की हॉकी. ऑलिम्पिक स्पर्धांत भारत हॉकीमध्ये सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत होता. 1928 ते 1980 दरम्यान भारताने 12 ऑलिम्पिकमध्ये 11 पदके जिंकली. ज्यामध्ये तब्बल 8 सुवर्ण पदकांचा समावेश होता ज्यातील सहा तर 1928 ते 1956 पर्यंत भारताने सलग जिंकली होती. विशेष म्हणजे या 1928 ते 1936 ऑलिम्पिक खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा होता मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांचा. त्यांचा खेळ इतका अप्रतिम होता की संपूर्ण जगातून त्याचं कौतुक होत असे. 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये त्यांचा खेळ पाहून जर्मनीचा हुकमशहा अॅडॉल्फ हिटलर देखील त्यांचा दिवाना झाला. त्याने ध्यानचंद यांना जर्मनीकडून खेळण्याची ऑफरही दिली, पण ध्यानचंद यांनी ही ऑफर नाकारली होती. ध्यानचंद यांच्यान निवृत्तीनंतरही 1980 पर्यंत भारत हॉकीमध्ये वर्चस्व गाजवत होता. पण त्यानंतर मात्र भारताला बराच काळ एकही पदक हॉकीमध्ये जिंकता आलं नाही. अखेर नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारताने कांस्य पदक जिंकत पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा दिला.


अभिनव बिंद्रानं मिळवलं 'पहिलं सुवर्णपदक'


भारताने मागील काही वर्षांत विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये, कर्णम मल्लेश्वरीने महिलांच्या 69 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. हे भारतीय महिलेने जिंकलेले पहिले ऑलिम्पिक पदक होते. त्यानंतर 2004 च्या अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये, स्टार नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोडने पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप नेमबाजीत रौप्य पदक जिंकले. ज्यानंतर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये, अभिनव बिंद्राने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिक खेळांमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला. मग विजेंदर सिंहने मिडलवेट प्रकारात कांस्यपदकासह बॉक्सिंगमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल 83 सदस्यीय भारतीय संघाने खेळांमध्ये भाग घेतला आणि एकूण सहा पदकांसह देशासाठी एक नवीन सर्वोत्तम कामगिरी केली. कुस्तीपटू सुशील कुमार हा स्वातंत्र्यानंतर अनेक वैयक्तिक ऑलिम्पिक पदके (2008 ऑलिम्पिकमध्ये कांस्य आणि 2012 ऑलिम्पिकमध्ये रौप्य) मिळवणारा पहिला भारतीय बनला. सायना नेहवालने महिला एकेरीत बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकून बॅडमिंटनमध्ये देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक जिंकले. महिलांच्या फ्लायवेट विभागात कांस्यपदकासह बॉक्सिंगमध्ये पदक जिंकणारी मेरी कोम ही पहिली भारतीय महिला ठरली. स्टार नेमबाज गगन नारंगने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले. विजय कुमारने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आणखी एक पदक जोडले. 


टोक्यो ऑलिम्पिक ठरली सर्वात बेस्ट


भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात नुकतीच पार पडलेली टोक्यो ऑलिम्पिक 2020 ही स्पर्धा सर्वात उत्तम ठरली. या ऑलिम्पिकमध्ये भारताने आजवरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी 7 पदकं खिशात घातली. विशेष म्हणजे भालाफेकपटू नीरज चोप्राने यावेळी सुवर्णपदक जिंकलं. तर वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्य, पैलवान रवी दहियाने रौप्य, पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदक जिंकल. याशिवाय महिला बॉक्सर लवलिनाने कांस्य आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक जिंकल. भारतीय हॉकी संघानेही कांस्य पदकावर यंदा नाव कोरलं. नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्सममध्येही भारताने 50 अधिक पदकं जिंकत इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली, दरम्यान भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील ही कामगिरी पाहता भविष्यातील ऑलिम्पिकमध्ये भारत आणखी उत्तम कामगिरी करुन जागतिक रँकिंगमध्ये नक्कीच सुधारणा करेल यात शंका नाही. 


हे देखील वाचा -