Trimbakeshwer Rain : नाशिकमध्ये (Nashik) काल सायंकाळपासून सुरु मुसळधार पावसाने नाशिक शहराला झोडपून काढले. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे श्रावणी सोमवारच्या (Shravani Somvar) पूर्व संध्येला जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजेपासून सुरु असलेला पाऊस मध्यरात्रीपर्यत असल्याने श्रावणी सोमवारसाठी आलेल्या भाविकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. 


दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काल सायंकाळी नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस बरसला. यावेळी शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. शिवाय रविवार व श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर आलेल्या भाविक व पर्यटकांना चांगलाच झोडपून काढले. यामुळे स्थानिकांची तसंच पर्यटकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. मात्र सकाळपासून शहर परिसरात पावसाची उघडीप असून शहरातील पाणीही कमी झाले आहे. 


त्र्यंबकेश्वर शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिर रोड, तेली गल्ली, गाढई, पाच आळी, शिखरे मार्ग, कुशावर्त परिसर हा भाग पाण्याखाली गेला. परिसरातील रस्ते जलमय झाल्याने वाहने चालविणे मुश्किल झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच रविवारची सुट्टी, श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मध्ये हजारो भाविक दाखल झाले असून या पावसाने भाविकांची धावपळ झाली. मध्यरात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु असल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरपरिषदेकडून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. 


श्रावणी सोमवार पाण्यात 
दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे शहरात श्रावणी सोमवार निमित्त दाखल  झालेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. जवळपास 50 ते 60 हजार भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल असल्याची माहिती शहर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका!
दरम्यान त्र्यंबकेश्वर शहर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक अडकले. मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक अडकले होते. मोबाईलला रेंज नसल्यानं संपर्कही होत नव्हता. अखेर पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली आणि बचावकार्य सुरु झाले. पाऊस, अंधार यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. पण अखेर प्रशासनाना 17 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. तरिही एका पर्यटकाचा मात्र अद्याप शोध सुरु आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन, गिर्यारोहक सर्व यंत्रणा वेळीच न पोहचल्यानं पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.