Jemimah Rodrigues : भारतीय स्टार खेळाडूचा फोन नंबर लीक, अनोळखी 1000 व्हॉट्सअॅप मेसेज, रागात घेतला मोठा निर्णय, सामन्याआधी नेमकं काय घडलं होतं?
Jemimah Rodrigues News Marathi : भारतला वर्ल्ड कप 2025 जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Why Jemimah Rodrigues Uninstalled WhatsApp : भारतला वर्ल्ड कप 2025 जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्सने एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की 2025 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिला तिचे व्हॉट्सअॅप डिलीट करावे लागले. आणि यामागचं कारणही तितकंच अवाक् करणारे आहे.
जेमिमा रॉड्रिग्सने एका मुलाखतीत या निर्णयाचे कारण सांगितले. जेमिमा म्हणाली की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शतक केल्यानंतर आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतर तिचा फोन सतत वाजत होता. तिला सतत कॉल आणि मेसेज येत होते. तिला अज्ञात लोकांकडूनही कॉल आणि मेसेज येऊ लागले, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि तिने तिचे व्हॉट्सअॅप डिलीट केले.
जेमिमाने केला मोठा खुलासा
क्रिकबझला दिलेल्या खास मुलाखतीत जेमिमा म्हणाली, “सेमीफायनलमध्ये माझी इनिंग झाल्यानंतर माझा फोन न थांबता वाजत होता. सतत कॉल्स येत होते. अनोळखी लोकांना माझा नंबर कसा मिळाला, मला अजिबात कळलं नाही. मी अतिशयोक्ती करत नाही, पण मला तब्बल 1000 व्हॉट्सअॅप मेसेज आले होते. काय करावं काहीच सुचत नव्हतं. कारण आम्ही फायनलमध्ये पोहोचलो होतो आणि अजून टूर्नामेंट संपलेली नव्हती. हो, आम्ही सेमीफायनल जिंकलो, मी चांगली खेळी केली… पण अजून वर्ल्ड कप फायनल जिंकणं बाकी होतं.”
जेमिमा पुढे म्हणाली, “एक वेळ अशी आली की मला जाणवलं. हे सगळं आता खूपच वाढत चाललं आहे. मग मी थेट WhatsApp डिलीट करून टाकलं. मी माझ्या जवळच्या लोकांना मेसेज करून सांगितलं की त्यांनी मला थेट कॉल किंवा साधा टेक्स्ट मेसेज करावा, कारण मी WhatsApp वापरणार नाहीये. फायनल संपेपर्यंत मी पूर्णपणे सोशल मीडियापासून दूर राहिले. वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच मी पुन्हा चालू केले.
सोशल मीडिया उघडताच माझ्या फोनवर फक्त भारतीय संघाच्या चॅम्पियन होण्याच्या रील्स दिसत होत्या. असं दृश्य मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं. आजही जेव्हा मी इंस्टाग्राम उघडते, तेव्हा सगळ्यात आधी माझाच व्हिडिओ दिसतो. कुणीतरी ना कुणीतरी माझ्याबद्दल बोलतच असतं.”
विश्वचषकात जेमिमाची जादू...
2025 च्या विश्वचषकात जेमिमाहने सात डावांमध्ये 58 पेक्षा जास्त सरासरीने 292 धावा केल्या. तिचा स्ट्राईक रेटही 100 पेक्षा जास्त होता. 30 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात जेमिमाने नाबाद 127 धावा केल्या आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 339 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने नऊ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
हे ही वाचा -
Video : लवकरच स्मृती मानधनासोबत लग्न.... पलाश मुच्छल पहिल्यांदाच कॅमेरासमोर; आईची रिअॅक्शन व्हायरल




















