दुखापतग्रस्त राहुलच्या जागी कोण? मुंबई इंडियन्सच्या दोघांसह 6 नावांचा पर्याय
WTC 2023 : राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाला पर्याय शोधावा लागणार आहे.
WTC 2023 : खेळाडूंच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढलेय. ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकले आहेत. यामध्ये आता केएल राहुल याचीही भर पडली आहे. आयपीएलमध्ये केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्याची दुखापत गंभीर असून उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधून त्याचा पत्ता कट झाला आहे. केएल राहुल याला विकेटकिपर आणि मध्यक्रम फलंदाजीसाठी संघात स्थान दिले होते. त्याशिवाय पर्यायी सलामी फलंदाज म्हणूनही राहुल याच्यावर जबाबदारी होती. राहुल दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाला पर्याय शोधावा लागणार आहे. केएल राहुलच्या जागी बीसीसीआय कुणाला संधी देतेय, याची चर्चा सध्या सुरु आहे. बीसीसीआयपुढे अनेक पर्याय आहेत, पण इंग्लंडमध्ये कोण चांगली कामगिरी करु शकेल.. याबाबत चर्चा सुरु आहेत.
सूर्यकुमार यादव -
राहुलच्या दुखापतीनंतर सर्वात आधी सूर्यकुमार यादव याच्या नावाचा विचार केला जाईल. सूर्यकुमार यादव आक्रमक फलंदाजी करण्यात तरबेज आहे.. मध्यक्रममध्ये संघाला चांगली मजबुती देऊ शकतो. बॉर्डर गावस्कर मालिकेत सूर्यकुमारला संधी देण्यात आली होती. पण त्याला प्रभाव पाडण्यात अपयश आले. बीसीसीआय पुन्हा सूर्यकुमारवर विश्वास दाखवणार का? याची चर्चा सुरु आहे.
ईशान किशन -
विकेटकिपर फलंदाज म्हणून ईशान किशन याचा विचार होऊ शकतो. पण ईशान किशन कसोटीमध्ये त्या दर्जेची विकेटकिपिंग करु शकेल का? याबाबत बीसीसीआय विचार करु शकते. ईशान किशन सलामीला चांगला पर्याय आहे.. मध्यक्रम तसेच सलामीला इशान प्रभावी कामगिरी करु शकेल. विकेटकिपिंगचे स्किल तितकेसे चांगले नाही, त्यामुळे बीसीसीआय विचार करु शकेल.
वृद्धीमान साहा -
38 वर्षीय वृद्धीमान साहा गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये साहा भन्नाट कामगिरी करत आहे. फलंदाजी आणि विकेटच्या मागे साहा प्रभावी दिसत आहे. वृद्धीमान साहा याला राहुल द्रविड याने निवृत्तीचा विचार करण्यास सांगितले होते.. पण सध्या टीम इंडियाकडे अनुभवी खेळाडू नाही.. त्यामुळे बीसीसीआय पुन्हा एकदा साहाचा विचार करु शकते. वृद्धीमान साहा याच्याकडे तगडा अनुभव आहे. त्याशिवाय तो मध्यक्रम आणि सलामीला फलंदाजी करु शकतो. त्यामुळे साहा याचा विचार बीसीसीआय करु शकते...
अभिषेक पोरेल -
अभिषेक पोरेल याने दिल्ली कॅपिटल्समध्ये दुखापतग्रस्त ऋषभ पंतची जागा घेतली. पोरेल फलंदाजीत अद्याप प्रभावी दिसत नसला तरी विकेटच्या मागे त्याने दमदार कामगिरी केली. विकेटच्या मागे जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने धावांचा पाऊस पाडलाय. अभिषेक पोरेल याच्या नावाचा विचार बीसीसीआय करेल. गेल्या वर्षी भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा अभिषेक सदस्य होता. 2022 मध्येच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. अभिषेक पोरेल याने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 695 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली.
हनुमा विहारी -
वर्षभरापूर्वी हनुमा विहारी विदेशात टीम इंडियाचा महत्वाचा सदस्य होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात हनुमा विहारीने दमदार कामगिरी केली. 2018-19 आणि 2020-21 यादरम्यान हनुमा विहारी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होता. विदेशात खेळण्याचा हनुमा विहारीकडे तगडा अनुभव आहे. दुखापत असतानाही हनुमा विहारी याने ऑस्ट्रेलियात किल्ला लढवला होत्या. वेळ पडल्यास हनुमा विहारी गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे बीसीसीआय हनुमा विहारीचा विचार करु शकते.
मयंक अग्रवाल -
राहुलचा मित्र मयंक अग्रवाल टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज आहे. आयपीएलमध्ये त्याची बॅट शांत आहे, पण रणजीमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. मयंक अग्रवाल याच्याकडे तगडा अनुभव आहे. सलामीला आणि मध्यक्रममध्ये तो चांगली फलंदाजी करु शकतो. रणजीमध्ये मयंक अग्रवाल याने 13 सामन्यात 990 धावा चोपल्या आहेत. रहाणेप्रमाणे मयंक अग्रवाल याचेही टीम इंडियात पुनरागमन होऊ शकते.