Virat Kohli Retirement: #269, Signing Off विराट कोहलीच्या भावनिक संदेशातील शेवटची ओळ, हॅशटॅगचा नेमका अर्थ काय?
Virat Kohli Retired from Test Cricket: अखेर विराट कोहलीने कटू निर्णय घेतलाच, कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Virat Kohli Retirement: 'भारताची रनमशीन', 'चेस मास्टर', 'किंग कोहली', 'भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा' अशा अनेक बिरुदावली आणि विशेषणांचा धनी असलेल्या विराट कोहली याने सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. भारतीय क्रिकेटला (Indian Cricket) एक नवी ओळख प्राप्त करुन देणाऱ्या आणि नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या विराट कोहली (Virat Kohli Retires) याच्या निवृत्ती भारताच्या कसोटी क्रिकेटमधील एका अध्यायाचा अन्याय झाला आहे. लोकांनी थांब म्हणण्यापेक्षा आपली जाण्याची योग्य वेळ ओळखून विराट कोहली याने इंग्लंडच्या दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. विराट कोहली याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या भावनिक संदेशाच्या शेवटी #269, साईनिंग ऑफ, असे लिहले आहे. विराटच्या या पोस्टनंतर हा #269 म्हणजे काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हा #269 म्हणजे दुसरे तिसरे काही नसून विराट कोहली याच्या कसोटी क्रिकेट कॅपचा नंबर आहे.
विराट कोहली कसोटी क्रिकेटला अलविदा करताना भावनिक झाला, म्हणाला....
कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ (भारताची टोपी) प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळं स्थान असतं. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट आहे. हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.
या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही, पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिलं, पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिलंय.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत आहे. या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आलंय, माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन!
आणखी वाचा
एका मालिकेत सर्वाधिक द्विशतकांपासून ते सर्वाधिक शतकांपर्यंत, किंग कोहलीचे'हे' पाच विक्रम
अखेर विराट कोहलीने कटू निर्णय घेतलाच, कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा




















