Virat Kohli on India on Future : जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईन त्यावेळी... शुभमनच्या खांद्यावर हात ठेऊन विराट कोहली काय म्हणाला?
भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.

India vs New Zealand Champions Trophy 2025 : भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयानंतर देशभर आनंदाची लाट पसरली आहे. दरम्यान, ब्रॉडकास्टरशी बोलताना, स्टार फलंदाज विराट कोहलीने असे काही सांगितले ज्यामुळे चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की, 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर विराट कोहली एकदिवसीय सामन्यातून निवृत्त होणार का?
दुबईमध्ये खेळल्या गेलेला अंतिम सामना अटीतटीचा झाला. हा सामना पाहताना कोण जिंकणार याची उत्कंठा सर्वांनाच लागली होती. भारताचे बडे फलंदाज बाद झाल्यानंतर तर भारत जिंकणार का? असा चिंता वाढवणारा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात येत होता. परंतु केएल राहुलने हुशारीने फलंदाजी केली आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि कंपनीचा आनंद गगनाला भिडला होता. स्टार सलामीवीर शुभमन गिल ब्रॉडकास्टरशी बोलत असताना विराट कोहली तिथे पोहोचला आणि काहीतरी मोठे बोलला.
सामन्यानंतर विराट कोहली काय म्हणाला?
शुभमन गिल त्याची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकल्यानंतर खूप आनंदी दिसत होता. त्याने आपल्या तिरंगा गुंडाळून आनंद साजरा केला. विराट कोहलीने शुभमनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "हे आश्चर्यकारक आहे, आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर परत येऊन एक मोठी स्पर्धा जिंकायची होती, म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे आश्चर्यकारक आहे. ड्रेसिंग रूममध्ये एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू आहे, ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला त्यांना मदत करण्यास आनंद होत आहे."
KING 🤝 PRINCE
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
The mutual admiration shared between Virat Kohli & Shubman Gill! 💙#ChampionsTrophyOnJioStar #INDvNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/bFsKlgG82m
विराट कोहली पुढे म्हणाला की, मी या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझा अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत योगदान दिले आहे. आम्ही एका अद्भुत संघाचा भाग आहोत. जेव्हा आम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ त्यावेळी संघ एका चांगल्या स्थितीत असेल, संघातील खेळाडू हे सर्वोच्च खेळाडू असतील असा आमचा प्रयत्न आहे. टीम इंडियाची नेक्स्ट जनरेशन ही पुढची आठ वर्षे अपराजित असेल असा प्रयत्न असेल. भारताचे भविष्य चांगल्या हातात आहे, शुभमन, श्रेयसने शानदार कामगिरी केली आहे, केएलने सामने संपवले आहेत आणि हार्दिकने फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या शानदार फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या सामन्यापूर्वी रोहितच्या निवृत्तीबद्दल अटकळ होती, पण त्याने त्याच्या परिचित फॉर्ममध्ये परतून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर भारताने जिंकलेले हे दुसरे आयसीसी विजेतेपद आहे. 2002 आणि 2013 नंतर भारताने स्पर्धेत एकही सामना न गमावता तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. इतर कोणत्याही संघाने ही ट्रॉफी तीन वेळा जिंकलेली नाही.





















