(Source: ECI/ABP News/ABP Majha)
....तर विराट कोहली कसोटी सामन्यात तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करणार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याचंही स्थान संघात निश्चित नाही. अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीमुळे इतर फलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबई : न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना टीम इंडियानं गमावला. टीम इंडियाचा 8 विकेट्सने पराभव करत न्यूझीलँड संघानं पहिल्या कसोटी चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं. लाजीरवाण्या पराभवानंतर भारताच्या फलंदाजीवर सर्वस्तारांतून टीका होतं आहे. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) कसोटी संघात बदलाबाबतचे संकेत दिले आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहेत. इंग्लंडविरूद्ध विराट कोहली तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात बदल करण्याचा विचार संघ व्यवस्थापन गांभीर्याने करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्गज खेळाडूंवर टांगती तलवार आहे. पुजारा कसोटी संघातून बाहेर पडल्यास तिसर्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजी करताना दिसू शकतो.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याचंही स्थान संघात निश्चित नाही. अजिंक्य रहाणेच्या खराब कामगिरीमुळे इतर फलंदाजांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
केएल राहुल आणि हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता
विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर स्पष्ट आहे की, चेतेश्वर पुजाराशिवाय अंजिक्य रहाणेच्या जागेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मेलबर्न कसोटीत शतक करणारा अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरोधात मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला आहे.
एका वृत्तानुसार संघ व्यवस्थापनाला आता तरुण खेळाडूंना जास्त संधी द्यायची आहे. याशिवाय केएल राहुलचा शानदार फॉर्म पाहता आता भारतीय संघ त्याला मधल्या फळीत खेळण्याची संधी देऊ शकतो. याशिवाय हनुमा विहारीलाही आता जास्तीत जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ 2 जूनला इंग्लंडला रवाना होणार
भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.