U19 World Cup मध्ये युवा ब्रिगेड सुसाट, सलग तिसऱ्या विजयाची नोंद, USA चा 201 धावांनी पराभव
भारतीय संघाने (Team India) ग्रुप स्टेजमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात भारताने युएसएचा (IND vs USA) 201 धावांनी दारुन पराभव केला.
India vs USA : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये (Under 19 World Cup 2024) भारताच्या युवा ब्रिगेडची शानदार कामगिरी सुरुच आहे. भारतीय संघाने (Team India) ग्रुप स्टेजमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. ग्रुप स्टेजमधील शेवटच्या सामन्यात भारताने युएसएचा (IND vs USA) 201 धावांनी दारुन पराभव केला. या विजयासह भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याशिवाय सुपर 6 साठी भारताची युवा ब्रिगेड क्वालिफाय झाली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेटच्या मोबदल्या 326 धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून अर्शिन कुलकर्णी याने शतकी खेळी केली. त्याशिवाय मुशीर खान याने 73 धावांचं योगदान दिले. 327 धावांचा बचाव करताना भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. युएसएचा संघ 8 विकेटच्या मोबदल्यात 125 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताने 201 धावांनी विराट विजयाची नोंद केली.
यूएसएच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 326 धावांची विराट धावसंख्या उभारली. युएसएकडून अतींद्रा सुब्रमण्यम याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.
भारताच्या युवा ब्रिगेड एकतर्फी विजय -
भारताच्या युवा संघाने प्रथम शानदार फलंदाजी केली, त्यानंतर गोलंदाजीतही कमाल दाखवली. भारताने एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने दिलेल्या 327 धावांच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना यूएसएने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. यूएसएला पहिल्या षटकात मोठा धक्का बसला. सलामी फलंदाज प्रणव चेट्टीपलायम पहिल्या षटकात माघारी परतला. त्यानंतर दुसऱ्या षटकात दुसरा सलामी फलंदाज शून्यावर बाद झाला. त्यानंतर यूएसएचे फलंदाज ये रे माझ्या मागल्या प्रमाणे एकापाठोपाठ एक तंबूत परतले. यूएसएला आठव्या षटकात तिसरा झटका बसला. ऋषी रमेश आठ धावा काढून तंबूत परतला. सिद्धार्थ कप्पा याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याला भारतीय गोलंदाजीसमोर फारसा तग धरता आला नाही. 24 व्या षटकात त्याला भारताने बाद केले. त्याने 18 धावांचे योगदान दिले. उत्कर्ष श्रीवास्तव याच्या रुपाने भारताला पाचवं यश मिळाले. श्रीवास्तव याने 4 चौकारांच्या मदतीने 40 धावांची खेळी केली. पतन मानव याच्या रुपाने भारताला सहावे यश मिळाले. त्याला 30 व्या षटकात बाद करण्यात आले. त्यानंतर पार्थ पटेल 2 धावा काढून बाद दाला. आरिन नाडकर्णी 20 धावा काढून 49 व्या षटकात बाद झाला. त्याला सौमी पांडे याने तंबूचा रस्ता दाखवला.
भारतीय गोलंदाजांचा दबदबा -
327 धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. भारताकडून नमन तिवारी याने सर्वाधिक विकेट घेतल्या. नमन तिवारी याने 9 षटकात फक्त 20 धावा खर्च करत 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. यामध्ये त्याने तीन षटके निर्धाव फेकली. त्याशिवाय मुरुगन अभिषेक, प्रियांशु मोलिया, सौमी पांडे आणि राज लिम्बानी यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
आणखी वाचा :