Jay Shah ICC: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष बनले आहेत. जय शाह (Jay Shah) यांना मंगळवारी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध घोषित करण्यात आले. 1 डिसेंबरपासून ते आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. आयसीसीमध्ये महत्त्वाचे पद मिळाल्यानंतर जय शाह यांनी महिला, दिव्यांग आणि कसोटी क्रिकेटबाबत भाष्य केले आहे. 


बीसीसीआयचा हवाला देत जय शाह (Jay Shah) यांनी आयसीसी अध्यक्ष (ICC Chairman) झाल्यानंतर सांगितले की, माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आणि आयसीसी अध्यक्षपदाची ही सन्माननीय भूमिका स्वीकारल्याबद्दल मी आयसीसी सदस्य मंडळाचे आभार मानतो. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की मी या महत्त्वाच्या भूमिकेत पाऊल ठेवताना , मी तुमच्या उच्च अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि क्रिकेटच्या सुंदर खेळासाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी वचनबद्ध आहे. टी-20 हा एक रोमांचक फॉरमॅट असल्याने, कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही महिला क्रिकेट आणि दिव्यांग क्रिकेटवर अधिक संसाधने आणि लक्ष देऊन ते पुढे नेण्याचे विशेष प्रयत्न करणार असल्याचं जय शाह यांनी सांगितले


आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. क्रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे असल्याचं जय शाह यांनी सांगितले. 






जय शाह 1 डिसेंबर 2024 पासून पदभार स्वीकारणार-


नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 


संबंधित बातमी:


जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!