Jay Shah ICC Chairman: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले आहेत. आयसीसीने मंगळवारी (27 ऑगस्ट) जय शाह (Jay Shah) यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. आतापर्यंत बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी सांभाळणारे जय शाह 1 डिसेंबरपासून आयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. जय शहा यांची बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह हे पाचवे भारतीय आहेत. याआधी आयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणी सांभाळली आहे, जाणून घ्या...


1. जगमोहन दालमिया-


जगमोहन दालमिया हे आयसीसीचे अध्यक्ष बनणारे पहिले भारतीय होते. 1997 ते 2000 पर्यंत त्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले. मात्र, आता जगमोहन दालमिया या जगात नाहीत. 21 सप्टेंबर 2015 रोजी त्यांचे निधन झाले.


2. शरद पवार-


शरद पवार आयसीसीचे अध्यक्ष बनणारे दुसरे भारतीय ठरले. भारतीय राजकारणातील एक मोठा चेहरा शरद पवार यांनी 2010 ते 2012 या काळात या पदावर काम केले होते. आयसीसीचे पद स्वीकारण्यापूर्वी ते बीसीसीआयचे अध्यक्षही होते. शरद पवार 2005 ते 2008 पर्यंत बीसीसीआयचे अध्यक्ष होते.


3. एन श्रीनिवासन-


प्रसिद्ध उद्योगपती आणि चेन्नई सुपर किंग्जचे सहमालक एन.श्रीनिवासन यांनीही आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले आहे. एन.श्रीनिवासन यांनी 2014 ते 2015 या काळात आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. एन श्रीनिवासन अध्यक्ष झाल्यानंतरच आयसीसीच्या या पदाचे नाव बदलून 'चेअरमन' करण्यात आले.


4. शशांक मनोहर-


बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर हे देखील आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत. शशांक मनोहर यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ 2015 ते 2020 असा होता.


5. जय शाह-


नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 


आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे- जय शाह


आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर शाह यांनी क्रिकेटचा जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचा आणि लोकप्रियता वाढवण्याचा मानस व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे शाह म्हणाले. रिकेटला अधिक जागतिक बनवण्यासाठी ते आयसीसी आणि सदस्य देशांसोबत जवळून काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. मी आयसीसी टीमसोबत आणि सदस्य देशांसोबत मिळून क्रिकेटच्या जागतिकीकरणासाठी पूर्ण प्रयत्न करेन. आमचे लक्ष्य क्रिकेटचा जास्तीत जास्त प्रसार करणे आणि या खेळाला अधिक लोकप्रियता मिळवून देण्याचे असल्याचं जय शाह यांनी सांगितले. 


संबंधित बातमी:


जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!