Jay Shah ICC Chairman Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे बॉस झाले आहेत. जय शाह यांची आयसीसीच्या पुढील अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयसीसीने मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी त्याची अधिकृत घोषणा केली. यासोबतच ते परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्षही असतील. केवळ 35 वर्षांचे जय शाह 1 डिसेंबरपासून या पदाची सूत्रे हाती घेणार आहे. ते या पदावर विद्यमान चेअरमन ग्रेग बार्कले यांची जागा घेतील, जे सलग 4 वर्षे (2 टर्म) चेअरमन होते, परंतु त्यांनी तिसऱ्या टर्मसाठी नकार दिला होता. या घोषणेमुळे जय शाह यांना आयसीसी अध्यक्ष म्हणून किती पगार मिळणार, बीसीसीआयपेक्षा जास्त कमाई होईल का, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


जय शाह 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव होते आणि तेव्हापासून ते हे पद सांभाळत आहेत. आता हे पद सोडून आयसीसीची कमान सांभाळतील. आयसीसी चेअरमनचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो आणि कोणत्याही अध्यक्षाला जास्तीत जास्त 3 टर्म मिळू शकतात. अशा परिस्थितीत शाह पुढील काही वर्षांसाठी आयसीसीची धुरा सांभाळतील. पण आयसीसी अध्यक्ष म्हणून त्यांना पगार मिळेल? तो बीसीसीआयपेक्षा जास्त असेल का? हे काही प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात आहेत.




बीसीसीआयची कमाई कशी होते?


प्रथम बीसीसीआयबद्दल बोलूया. भारतीय क्रिकेट बोर्डामध्ये अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि कोषाध्यक्ष ही मोठी पदे आहेत. ही पदे असलेल्या अधिकाऱ्यांना मासिक किंवा वार्षिक वेतन मिळत नाही. म्हणजे निश्चित पगार नाही. असे असतानाही त्यांना त्यांच्या कामाचा खर्च मंडळाकडून दिला जातो. या अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे भत्ते आणि खर्च दिले जातात, त्यात मंडळाने गेल्या वर्षी वाढ केली होती. 


अध्यक्ष आणि सचिवांसह सर्व बड्या मानद अधिकाऱ्यांना टीम इंडियाशी संबंधित आयसीसीच्या बैठकींना किंवा परदेशी दौऱ्यांवर जाण्यासाठी 1000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 82 हजार रुपये दररोज भत्ता मिळतो. तसेच, त्यांना विमानात प्रथम श्रेणीत प्रवास करण्याची सुविधा मिळते.


त्याचप्रमाणे भारतातील विविध बैठकांना उपस्थित राहण्यासाठी एखाद्याला दररोज 40,000 रुपये भत्ता मिळतो आणि बिझनेस क्लास प्रवासाची सुविधा देखील मिळते. याशिवाय मंडळाच्या बैठकीव्यतिरिक्त इतर कामांसाठी वेगवेगळ्या शहरात जाण्यासाठी दररोज 30 हजार रुपये भत्ता दिला जातो. देशातील किंवा परदेशातील अधिकारी स्वत:साठी हॉटेल सूट रूम बुक करू शकतात, ज्याचा खर्च बोर्ड उचलतो.


जय शाह यांना आयसीसी पगार देणार का?


म्हणजे जय शाह यांना बीसीसीआयकडून पगार मिळत नाही, पण परदेशात होणाऱ्या बोर्ड मीटिंग आणि आयसीसीच्या बैठकींसाठी त्यांना चांगला खर्च येतो. आयसीसीमध्येही तशी तरतूद आहे. तेथेही अध्यक्ष, उपसभापती या अधिकाऱ्यांना ठराविक वेतन मिळत नाही. वेगवेगळ्या बैठका आणि कामाच्या आधारे त्यांना भत्ते आणि सुविधाही मिळतात. आजपर्यंत आयसीसीने आपल्या अधिकाऱ्यांना भत्ते किंवा इतर सुविधा म्हणून किती पैसे दिले आहेत हे जाहीर केलेले नाही.


हे ही वाचा -


जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे 5 वे भारतीय; याआधी कोणी अध्यक्षपद भूषविले?, पाहा!