Team India : रोहित शर्मानंतर वनडेमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण? अगोदर श्रेयस अय्यरच्या नावाची चर्चा, आता नवं नाव समोर
India ODI Captain: टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. रोहित शर्मानं यापूर्वी टी 20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे.त्यामुळं रोहितनंतर वनडेचा कॅप्टन कोण होणार या चर्चा होत असतात.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे सध्या तीन कॅप्टन आहेत. कसोटीत शुभमन गिल, वनडे मध्ये रोहित शर्मा आणि टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट टीमच्या वनडेमधील कर्णधारासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. काही रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला की येत्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय श्रेयस अय्यरला एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी देईल. मात्र, यामध्ये नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत, एका नव्या रिपोर्टनुसार श्रेयस अय्यरऐवजी दुसऱ्या खेळाडूकडे वनडे टीमचं नेतृत्त्व सोपवलं जाऊ शकतं.
रोहित शर्मा वनडे टीमचा कॅप्टन आहे, तर टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करतोय, शुभमन गिलकडे कसोटीचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. आता नव्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की शुभमन गिलकडेच वनडे टीमचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. काही रिपोर्टमध्ये वनडे टीमचं नेतृत्व श्रेयस अय्यरकडे दिलं जाऊ शकतं असं म्हटलं होतं. मात्र, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटलं की अशी काही चर्चा झालेली नाही.
तीन टीमसाठी एकच कॅप्टन
रेवस्पोर्ट्सच्या एका रिपोर्टनुसार रोहित शर्मानंतर शुभमन गिल वनडे संघाचा कॅप्टन होईल हे निश्चित आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की वनडे टीमच्या कर्णधार पदासाठी दुसरा कोणी दावेदार नाही. याशिवाय रिपोर्टमध्ये हा देखील दावा करण्यात आला की भविष्यात शुभमन गिल कसोटी, वनडे आणि टी 20 चा कॅप्टन असेल, अशी आशा आहे.
दरम्यान, शुभमन गिल 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा उपकप्तान होता. शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या संघाचा कॅप्टन आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आलं होतं. रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची निवड करण्यात आली होती. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. सध्या रोहित शर्मा भारताचा वनडे टीमचा कॅप्टन आहे, येत्या काळात रोहित शर्मानंतर वनडेमध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार हा प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे.





















