Team India : रोहितसेनेनं ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला, आता टीम इंडियानं 'या' चुका पुन्हा केल्यास महागात पडेल, कारण...
Team India : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी इंग्लंडला पराभूत करावं लागणार आहे.
सेंट लूसिया : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडियानं (Team India) ऑस्ट्रेलियाला (Australia) टी 20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 च्या लढतीत पराभूत केलं आहे. भारतानं या विजयासह ऑस्ट्रेलियानं वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत केलेल्या पराभवाची परतफेड केली आहे. रोहित शर्मानं एकहाती किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार केला. विराट कोहली शुन्यावर बाद झाल्यानंतर रोहित शर्मानं एकाबाजून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्माच्या 92 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 205 धावा केल्या. मात्र, टीम इंडियाच्या इतर फलंदाजांना रोहित शर्मानं ज्या गतीनं धावा केल्या तो वेग इतरांना कायम ठेवता आला नाही. त्यामुळं रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजानं खेळपट्टीवर तळ ठोकून थांबणं आवश्यक होतं.
मिशेल मार्शला दोनदा जीवदान महागात
अर्शदीप सिंगनं पहिल्याच ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नरची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं होतं. यानंतर फलंदाजीला आलेल्या मिशेल मार्शला दोनदा जीवदान मिळालं. रिषभ पंत बॉलपर्यंत वेळेत पोहोचू न शकल्यानं एकदा मिशेल मार्शला जीवदान मिळालं. यानंतर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर मिशेल मार्शला जीवदान मिळालं. मिशेल मार्शच्या मारलेला बॉल अर्शदीप सिंगच्या हातातून निसटला. यानंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मिशेल मार्श षटकार मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मिशेल मार्शनं 37 धावा केल्या.
टीम इंडियाला रणनीती बदलणार की कायम ठेवणार?
इंग्लंड विरुद्ध भारताची मॅच गयाना येथे होणार आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत विराट कोहलीची कामगिरी भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. विराट कोहलीला आतापर्यंत सलामीला बांगलादेश विरुद्धचा अपवाद वगळता दमदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं उपांत्य फेरीच्या लढतीत रोहित शर्मा सलामीला विराट कोहली सोबत येणार की यशस्वी जयस्वालला संधी दिली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची खेळी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. इंग्लंडनं भारताला 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 10 विकेटनं पराभूत केलं होतं. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यासह टीम इंडियाचे सर्व खेळाडू त्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत भारतानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकही मॅच गमावली नाही.
संबंधित बातम्या :
टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध त्या चुका टाळाव्या लागणार, अन्यथा बसेल मोठा फटका