Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय आणि लष्करी संबंधाचा परिणाम क्रिकेटवरही होतो. या दोन देशांदरम्यान सीमेवर तणाव सुरु असल्याने गेल्या 17 वर्षांमध्ये टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानचा एकही क्रिकेट दौरा केला नाही. पण आता टीम इंडिया पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. 2023 मध्ये होणाऱ्या आशिया कपच्या यजमानपदाचा मान पाकिस्तान क्रिकेट बोर्डला (PCB) मिळाला आहे.
'क्रिबझ' या क्रिकेटशी संबंधित वेबसाईटने माहिती दिली आहे की, 2023 साली होणाऱ्या आशिया कपच्या आयोजनाची संधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला मिळाली आहे. आता ही स्पर्धा पाकिस्तानमध्येच होणार की यूएईमध्ये खेळवण्यात येणार याचा खुलासा पाकिस्तान क्रिकेट बोर्डने अद्याप केला नाही.
पाकिस्तानमधील असुरक्षितता आणि दहशतवादाची समस्या लक्षात घेता या अनेक देशांनी पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या देशात होणारे अनेक सामने हे यूएईमध्ये खेळवण्यात आले आहेत. येत्या दोन वर्षात जर पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारली नाही तर आशिया कप स्पर्धाही यूएईमध्ये खेळवावी लागेल.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावग्रस्त संबध लक्षात घेता, गेल्या काही वर्षांमध्ये केवळ क्रिकेटच्या माध्यमातून हे दोन देश एकत्र आले आहेत. या दोन संघांच्या दरम्यान शेवटचा सामना हा इंग्लडमध्ये झालेल्या 2019 सालच्या वर्ल्ड कप दरम्यान झाला होता. आता पुढच्या आठवड्यात टी 20 वर्ल्ड कप सुरु होणार असून 24 ऑक्टोबरला हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत.
पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचं आयोजन यशस्वी होतं का यावरच आशिया कपचे भवितव्य अबलंबून आहे.
गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता आशिया कप 2020 रद्द करण्यात आला होता.
संबंधित बातम्या :