Sanjay Manjrekar on Ashwin: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा 14 वा हंगाम दिल्ली कॅपिटल्सचा (DC) स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी (R Ashwin) विशेष नव्हता. या मोसमात त्याने 13 सामने खेळले आणि फक्त 7 विकेट्स घेतल्या. बुधवारी क्वालिफायर 2 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) फलंदाज राहुल त्रिपाठीने अश्विनला षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यामुळे दिल्लीचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्नही भंगले. अश्विनच्या कामगिरीवर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर भडकले आहेत. ते म्हणाले की, अश्विनसारख्या खेळाडूला मी टी-20 संघात घेतलच नसतं.


केकेआरला शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज होती. अश्विनने ओव्हरची शानदार सुरुवात केली. त्याने शाकिब अल हसन आणि सुनील नरेनला एकापाठोपाठ एक चेंडूंमध्ये बाद केले. पण त्याने राहुल त्रिपाठीला ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडू फेकला, ज्याला केकेआरच्या फलंदाजाने लाँगऑफवर षटकार ठोकला. अश्विनने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण एका खराब चेंडूने दिल्लीला अंतिम फेरीतून बाहेर फेकले.


'अश्विनबद्दल खूप बोलले जाते'
मांजरेकर म्हणाले, 'अश्विनबद्दल खूप बोलले जाते. तो टी -20 गोलंदाज नाही. जर तुम्ही त्याला बदलू इच्छित असाल तर ते होईल असे मला वाटत नाही. कारण, तो गेल्या सात वर्षांपासून असाच आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये तो एक उत्तम गोलंदाज आहे. मांजरेकर पुढे म्हणाले की, अश्विन तिन्ही फॉरमॅटमध्ये सारखीच गोलंदाजी करतो. त्याने युझवेंद्र चहल किंवा वरुण चक्रवर्तीला टर्न टेक विकेटवर संघात घेतले असते असेही ते म्हणाले. संजय मांजरेकर म्हणाले की, फ्रँचायझी अश्विनला त्यांच्या संघात घेण्यास स्वारस्य दाखवू शकत नाहीत. तो टी -20 मध्ये विकेट घेणारा नाही. मला असे वाटत नाही की त्याला धावा थांबवण्यासाठी संघात घेतले जाईल.


रोमांचक सामन्यात कोलकाताची दिल्लीवर मात


आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना रोमांचक ठरला.  शारजाहच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने दिल्लीवर 4 विकेट्सनी विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक घेतली आहे.  या  सामन्यात राहुल त्रिपाठीने मोक्याच्या क्षणी षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला आहे कोलकाता आपल्या तिसऱ्या आयपीएल किताबावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे.