नवी दिल्ली : मल्टिप्लेक्स चेन असलेल्या आयनॉक्सने आता टी 20 वर्ल्डकपचा थरार त्यांच्या थीएटर्समध्ये दाखवण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामन्यांचा आनंद आता मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. सातवा आयसीसी टी 20 वर्ल्ड या वर्षी यूएई आणि ओमनमध्ये होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआय करणार आहे.
आयनॉक्सने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतीय संघाचे सर्व सामने आयनॉक्सच्या थीएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत.
भारतातील क्रिकेटचे वेड लक्षात घेता आयनॉक्सने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. तसेच या दरम्यान थीएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचाही अनुभव घेता येणार आहे. या दरम्यान कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय आयनॉक्सने घेतला आहे. या मल्टिप्लेक्स थीएटरमध्ये सामने पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. मेट्रो शहरात हा तिकीट दर 500 रुपये तर इतर शहरात तो 200 रुपये इतका असेल.
24 ऑक्टोबर रोजी होणार पहिला सामना
भारतीय संघ 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात टी20 वर्ल्ड कपचा पहिला सामना खेळणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ आमने- सामने येणार आहेत. त्यानंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबूधाबीमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरोधात असेल.
ICC टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन , शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
संबंधित बातम्या :