रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, इंग्लंडविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का?
Virat Kohli : रनमशीन विराट कोहली याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. भारतीय संघ आतापर्यंत जिंकत आलाय, पण विराट कोहलीकडून नेहमीच मोठ्या आणि ठसकेदार खेळीची अपेक्षा केली जाते.
Virat Kohli : रनमशीन विराट कोहली याला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. भारतीय संघ आतापर्यंत जिंकत आलाय, पण विराट कोहलीकडून नेहमीच मोठ्या आणि ठसकेदार खेळीची अपेक्षा केली जाते. पण टी20 विश्वचषक 2024 मध्ये विराट चाहत्यांच्या अपेक्षावर खरा उतरलेला नाही. उपांत्य सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करेल, अशीच सर्वांना आशा आहे.
2012 मध्ये विराट कोहली पहिल्यांदा टी20 विश्वचषकात खेळला होता, तेव्हापासून 2022 पर्यंत विराट कोहलीने प्रत्येक टी20 विश्वचषकात खोऱ्याने धावा चोपल्या. टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. पण यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीवर फॉर्म रुसल्याचे चित्र आहे. 2022 विश्वचषकात विराट कोहलीने तर खोऱ्याने धावा चोपल्या होत्या. पाकिस्तानविरोधात केलेली वादळी फलंदाजी, आजही सर्वांच्या स्मरणात आहेच. पण यंदा विराटला फॉर्म गवसलेला नाही. इंग्लंडविरोधात मोक्याच्या सामन्यात विराट कोहली खेळणार का? विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघणार का? यासारख्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण विराटसाठी जमेची बाजू म्हणजे इंग्लंडचा संघ आहे. इंग्लंडविरोधात विराट कोहली नेहमची शानदार खेळत आलाय. आता नॉकआऊट सामन्यात विराट कोहली नावाप्रमाणे फलंदाजी करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
इंग्लंडविरोधात विराटची बॅट नेहमीच तळपते -
टी20 विश्वचषकात विराट कोहलीची बॅट नेहमीच तळपते, यंदा त्याला लौकिकास साजेशी कामगीरी करता आलेली नाही. पण इंग्लंडविरोधात विराट कोहली मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. विराट कोहली इंग्लंडविरोधात नेहमीच धावा काढतो. विराट कोहलीने इंग्लंडविरोधात 20 सामन्यात 639 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकाचा समावेश आहे. विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 80 इतकी आहे.
विराट कोहली विश्वचषकात फ्लॉप -
रनमशीन विराट कोहलीला विश्वचषकात अद्याप एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही. टी20 विश्वचषकातील 6 सामन्यानंतरही विराटच्या बॅटमधून एकही मोठी खेळी निघालेली नाही. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 37 इतकी आहे, ती अफगाणिस्तानविरोधात खेळला होता. बांगलादेशविरोधात फक्त 24 धावा काढता आल्या होत्या. साखळी सामन्यात विराट कोहलीला दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती. पाकिस्तानविरोधात विराट कोहलीला फक्त चार धावाच काढता आल्या होत्या. तर अमेरिकाविरोधात विराट खातेही उघडता आले नव्हते. सुपर 8 मधील ऑस्ट्रेलियाविरोधात विराट कोहली शून्यावर तंबूत परतला होता. विराट कोहलीची खराब कामगिरी पाहून क्रिकेट चाहत्यांकडून निराशा व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहलीला अद्याप सूर गवसलेला नाही. नॉकआऊट सामन्यात तरी विराट कोहलीची बॅट चालेल का? असा सवाल उपस्थित होतोय.