Rahul Dravid Bharat Ratna नवी दिल्ली: भारतानं 2007 नंतर 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीच्या लढतीत पराभूत करत विश्वविजेतेपद मिळवलं. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधील अंतिम फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर राहुल द्रविडनं टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रोहित शर्माच्या एका फोन कॉलमुळं टी 20 वर्ल्ड कपपर्यंत राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षकपदावर राहण्याचा निर्णय घेतला. टी 20 वर्ल्ड कप जिंकत गोड आठवणींसह राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक पदावरुन पायउतार झाला. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावं अशी मागणी केली आहे.  


राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कारानं केंद्र सरकारनं सन्मानित करणं योग्य राहील, तो त्याचा दावेदार देखील आहे, असं सुनील गावसकर यांनी म्हटलं.राहुल द्रविड महान खेळाडू आणि कॅप्टन राहिला आहे. जेव्हा राहुल खेळत होता त्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका जिंकणं अवघड होतं. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात मालिका जिंकणारा राहुल द्रविड तिसरा कॅप्टन ठरला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीत नव्या खेळाडूंना उभं करण्यात त्याचं योगदान महत्त्वाचं आहे, असं सुनील गावसकर म्हणाले. 


राहुल द्रविडचं भारतीय क्रिकेटमधील योगदान 


राहुल द्रविडनं भारतासाठी 164 कसोटी मॅचेसमध्ये 13,288 धावा केल्या. तर, 344 वनडे मॅचेसमध्ये 10,889  धावा केल्या आहेत. राहुलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर 48 शतकं आणि 146 अर्धशतकं आहेत. 2003 च्या दरम्यान भारतीय संघात तज्ज्ञ विकेटकीपर नव्हता त्यावेळी राहुल द्रविडनं विकेटकीपर म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राहुल द्रविडनं कोच म्हणून नवी इनिंग सुरु केली. 2014 मध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यावर मेंटॉर होता. भारत अ संघाच्या अंडर 19 टीमचा तो मुख्य प्रशिक्षक होता.  भारताची अंडर 19 टीम 2016 मध्ये वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली होती. मात्र त्यांना विजय मिळवता आला नव्हता. पुढे दोन वर्षांनी भारतानं ती ट्रॉफी जिंकली. रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर आणि ईशान किशन यासारख्या खेळाडूंच्या जडणघडणीत राहुल द्रविडचं महत्त्वाचं योगदान आहे. 


संबंधित बातम्या :


IND vs ZIM : झिम्बॉब्वेचा ऐतिहासिक विजय, टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडचा 13 धावांनी पराभव, अपयशाची कारणं कोणती?


झिम्बॉब्वेनं इतिहास रचला, विश्वविजेत्या भारतीय संघाला पराभवाचा धक्का, वॉशिंग्टन सुंदरची झुंज अपयशी