T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या 120 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान एकवेळ विजयाच्या जवळ होता. पण भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. 


टी-20 विश्वचषक 2024 मधील भारताचा हा दुसरा विजय आहे. भारताने आयर्लंडविरुद्ध पहिला सामना जिंकला होता. तर पाकिस्ताला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केले होते. तसेच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.


नाणेफेकीदरम्यान काय घडलं?


भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात आले तेव्हा एक मजेशीर घटना घडली. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांची त्यांच्या खास शैलीत ओळख करून दिली. यानंतर नाणेफेकीची वेळ आली. तर रोहित शर्माने समोर नाणे घेण्यासाठी हात पुढे केला, मग बाबरने रोहितला नाणं त्याच्याकडे असल्याचे सांगितले. मग रोहितने खिशातून नाणं काढलं. यानंतर नाणेफकीचा कौल झाला. हा गोंधळ आणि रोहित शर्माचा विसरभोळेपणा पाहून बाबर आझमही खळखळून हसताना दिसला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.






सामना कुठे फिरला?


पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, 8 फलंदाज उरले होते, पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची. फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या  आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: ओके...आता 30 मिनिटांनी भेटू; मुलाखतीत जसप्रीत बुमराहचं उत्तर, पत्नी संजनानेही घेतली फिरकी


T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर


T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र