T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने महत्वाची भूमिका बजावली. तर ऋषभ पंतने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. 


ऋषभ पंतला मिळाला पुरस्कार-


पाकिस्ताविरुद्ध सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण खूप आनंददायी आहे. तसेच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील सर्वोत्कृष्ण क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार विकेटकीपर ऋषभ पंतला देण्यात आला. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि समालोचनाची भूमिका निभावणारे रवी शास्त्री यांच्याकडून ऋषभ पंतला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अपघातानंतर पंतने केलेल्या पुनरागमनाचे कौतुक देखील रवी शास्त्री यांनी केले. आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 पासून भारतीय संघातील खेळाडूंना सर्वोत्तम क्षेत्ररक्षणासाठी पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. आता हाच ट्रेंड टी 20 विश्वचषक 2024 मध्येही सुरु आहे. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला सर्वोतकृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार देण्यात आला होता. 






पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.


सामना कुठे फिरला?


पाकिस्तानचा विजय जवळपास निश्चित दिसत होता. बाबर आझमच्या संघाला 48 चेंडूत 48 धावा करायच्या होत्या, 8 फलंदाज उरले होते, पण यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हतबल आणि असहाय्य दिसत होते. त्यामुळे पाकिस्तानी संघ हा सामना 6 धावांनी हरला. हार्दिक पांड्या भारताकडून 13 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात हार्दिक पांड्याने महत्त्वाची विकेट घेतली ती म्हणजे फखार जमानची. फखार जमानच्या विकेट्सने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. फखार जमान टी-20 मधील महत्वाचा फलंदाज होता. तसेच फखारने भारताविरुद्ध याआधी देखील चांगल्या धावा केल्या  आहेत. पण हार्दिकने फखारची घेतलेली विकेट सामन्यातील टर्निग पॉइंट ठरला. 


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs Pak: कधी पाकिस्तानच्या, तर कधी भारताच्या बाजूने...; थरारक सामन्याची A to Z स्टोरी, एका क्लिकवर


T20 World Cup 2024 Ind vs Pak: '119 धावा करुन पुन्हा मैदानात उतरलो तेव्हा...'; रोहित शर्माने खेळाडूंना दिला होता कानमंत्र


T20 World Cup 2024 Ind vs Pak: 12 चेंडूत 21 धावा...जसप्रीत बुमराह अन् अर्शदीप सिंगचा भेदक मारा; शेवटच्या षटकाचा थरार, Video