India vs Pakistan T20 World Cup 2024 : टी20 विश्वचषकात भारताविरोधात झालेला पराभव पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह भरमैदानातच ढसाढसा रडला. फक्त 120 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला सहा धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे नसीम शाह मैदानावर रडला. शाहीन आफ्रिदीने त्याची समजूत काढली. त्याशिवाय भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही नसीम खान याचं सांत्वन केले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रविवारी न्यूयॉर्कच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांचा लो स्कोरिंग सामना झाला. भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त 119 धावाच केल्या होत्या. नसीम खानच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे भक्कम फलंदाजी ढेपाळली होती. पण पाकिस्तानच्या फलंदाजांना 120 धावांचे आव्हानही पेलवले नाही. पाकिस्तानचा संघ फक्त 113 धावांपर्यंतच मजल मारु शकला. आघाडीच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या. त्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला. या पराभवानंतर नसीम शाह याला अश्रू अनावर झाले. पराभव झाल्याचं त्याला इतके लागले की भरमैदानातच तो ढसाढसा रडायला लागला. शाहीन शाह आफ्रिदीने त्याची समजूत काढून शांत केले. पण त्याच्या मनातील सल मात्र कायम राहणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नसीम शाह याचं सांत्वन केले. रोहित शर्माचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याशिवाय नसीम शाह याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
पाकिस्तानच्या आघाडीच्या फंलदाजांनी निराशा केल्यानंतर अखेरच्या 3 चेंडूवर 16 धावा काढण्याची जबाबदारी नसीम शाह याच्यावर होती. त्यानं सर्वतोपरी प्रयत्न केलं, परंतु यश मिळाले नाही. त्याने 4 चेंडूत 10 धावा काढल्या. पण विजय मिळवून देण्यात यश आले नाही. दोन वर्षांपूर्वी आशिया चषकात षटकार ठोकत पाकिस्तानला विजय मिळवून दिला होता. हा करिष्मा पुन्हा त्याला करता आला नाही. या पराभवानंतर नसीम शाह भावूक झाला, डोळ्यात अश्रू तरळले. शाहीन आफ्रिदीनं त्याला मिठी मारून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रोहित शर्मानेही त्याचं सांत्वन केले.
नसीम शाहचा भेदक मारा -
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह यानं भारताविरोधात भेदक मारा केला. नसीम शाह यानं 4 षटकात फक्त 21 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. नसीम शाह याने विराट कोहली, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याशिवाय त्याने फलंदाजी करताना 4 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता.