T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) महत्वाची भूमिका बजावली. तर ऋषभ पंतने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारत अवघ्या 119 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. पंतने 31 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. अक्षर पटेलने 20 धावा केल्या, पण अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तान जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करायला उतरला तेव्हा बाबर आझम फक्त 13 धावा करून लवकर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद रिझवानने 44 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली, मात्र तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
विजयानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?
आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आमच्या डावात आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मात्र आम्ही पुरेशी भागीदारी केली नाही आणि फलंदाजीत कमी पडलो. गेल्या सामन्याच्या तुलनेत चांगली विकेट होती. आम्ही जेव्हा फलंदाजी करुन गोलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा आम्ही विचार केला की आपल्या विकेट्स जाऊ शकतात, तर त्यांच्या पण विकेट्स आपण घेऊ शकतो, असं मी खेळाडूंना सांगितले. प्रत्येकाकडून थोडेसे योगदान मोठे फरक करू शकते. बुमराह एक ताकदवान खेळाडू आहे. तो काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. संपूर्ण विश्वचषकामध्ये त्याने त्या मानसिकतेत राहावे, असं रोहित शर्मा म्हणाला. तसेच मैदानात गर्दी देखील चांगली होती. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ही फक्त सुरुवात आहे, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असं रोहित शर्माने सांगितले.
पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानवरचा हा सातवा विजय आहे. 2007 च्या विश्वचषकात उभय संघांमध्ये पहिला सामना झाला होता. 2024 पूर्वी, दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये 7 सामने खेळले गेले होते, त्यापैकी 6 वेळा भारतीय संघ विजयी झाला होता. मात्र या विजयानंतर टी-20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा विजय-पराजय विक्रम 7-1 असा झाला आहे.
विराट कोहली पहिल्यांदाच अपयशी ठरला
याआधी विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खूप धावा केल्या होत्या. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 डावांमध्ये कोहलीने आतापर्यंत चार अर्धशतके झळकावली आहेत. ज्या डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नाही त्यातही तो 36 धावांवर नाबाद राहिला. पण 2024 च्या टी-20 विश्वचषकात तो केवळ 4 धावा करून बाद झाला होता. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची ही त्याची सर्वात कमी धावसंख्या आहे.