Suryakumar Yadav Test Debut : भारतीय कसोटी संघात अखेर 'सूर्योदय', ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार यादवचं संघात पदार्पण
India vs Australia: नागपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं आपली प्लेईंग-11 जाहीर केली असून सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात संधी मिळाली आहे.
Suryakumar Yadav Debut : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दरम्यान पहिल्या सामन्याच्या प्लेईंग-11 मध्ये सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्थान मिळालं आहे. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मैदानात कसोटी जर्सीमध्ये दिसणार आहे. ही त्यांची पदार्पणाची कसोटी आहे. दरम्यान सामन्याआधी नाणेफेकीपूर्वी सूर्याला कसोटी कॅप देण्यात आली. माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला कसोटी कॅप दिली. यादरम्यान सूर्यकुमार तसंच संपूर्ण संघाचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे होते. सूर्यकुमारसोबतच यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतही कसोटी पदार्पण करत आहे. त्याला देखील नागपूर कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेईंग-11 मध्येही स्थान मिळालं आहे.
View this post on Instagram
सूर्याचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता?
सूर्यकुमार यादवने 2010 साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या वर्षी त्याने मुंबईसाठी टी-20, लिस्ट-ए आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचा परिणाम म्हणजे सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला. 2012 मध्ये त्याला फक्त एकच IPL सामना खेळायला मिळाला पण त्यानंतर तो त्याच्या फ्रँचायझीचा नियमित खेळाडू बनला. गेल्या काही हंगामांपासून तो मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू राहिला आहे. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे सूर्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. 14 मार्च 2021 रोजी, सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चार महिन्यांनंतर त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने पहिला वनडे श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे खेळला. आता वर्षभरातच या खेळाडूने भारताच्या कसोटी संघातही स्थान मिळवले आहे.
सूर्यकुमार दमदार फॉर्मात
सूर्यकुमार यादव सध्या T20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. त्याने 48 T20 सामन्यांमध्ये 46.52 च्या सरासरीने आणि 175 च्या स्ट्राइक रेटने 1675 धावा केल्या आहेत. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा विक्रम तितकासा मजबूत राहिला नाही. सूर्याने वनडे फॉरमॅटमध्ये 20 सामन्यांमध्ये 28.86 च्या सरासरीने आणि 102 च्या स्ट्राइक रेटने 433 धावा केल्या आहेत.
कसा आहे भारतीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
हे देखील वाचा-