Maldives Sports Awards 2022: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) मालदीव सरकारकडून मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2022 मध्ये प्रतिष्ठित 'स्पोर्ट्स आयकॉन' पुरस्कारानं गौरविण्यात आलं. रिअल माद्रिदचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमैकाचा धावपटू असाफा पॉवेल, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सनथ जयसूर्या आणि डच फुटबॉल खेळाडू एडगर डेव्हिड्स यांच्यासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत सुरेश रैनाला नामांकन देण्यात आलं होतं. 


रैनाला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतील विविध कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. बांगलादेशचे युवा आणि क्रीडा मंत्री मोहम्मद झहीर अहसान रसेल यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सौदी अरेबियाचे क्रीडा उपमंत्री अल-कादी बद्र अब्दुल रहमान आणि मालदीव टेनिस असोसिएशनचे मानद अध्यक्ष अहमद नझीर हे देखील उपस्थित होते. 


सुरैश रैनानं मानले  मालदीवच्या राष्ट्रपती आणि क्रीडामंत्र्यांचे आभार
हा पुरस्कार सोहळा 17 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर रैनाने ट्विटद्वारे या सन्मानाबद्दल मालदीवचे राष्ट्रपती आणि क्रीडामंत्र्यांचे आभार मानले. "आदरणीय इब्राहिम मोहम्मद सोलिह आणि अहमद महलूफ यांचे आभार. जागतिक व्यासपीठावर जागतिक चॅम्पियन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची भावना आश्चर्यकारक आहे. सर्वोत्कृष्ट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन", असं ट्विट सुरेश रैनानं केलंय. 


सुरेश रैनाची आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सुरेश रैनाला मिस्टर आयपीएल म्हणून ओळखले जाते. त्यानं 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदापर्ण केलं होते. तेव्हापासून तो चेन्नईचा संघाचा भाग होता. दरम्यान, 2016 मध्ये स्पॉट फिक्सिंगमुळं चेन्नईच्या संघावर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी त्यानं दोन वर्षासाठी गुजरात लाईन्सचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर तो पुन्हा चेन्नईच्या संघात सामील झाला होता. आयपीएलमध्ये सुरेश रैनानं 205 सामन्यांमध्ये 32.5 च्या सरासरीनं 5 हजार 528 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha