Sudhir Naik Passes Away : वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिला चौकार लगावणारे सुधीर नाईक यांचं निधन; सुनील गावस्कर यांचे सलामीतील जोडीदार, 2011 विश्वचषकाशी खास नातं
Sudhir Naik Passes Away : भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात सुधीर नाईक हे सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामीसाठी उतरले होते. एकदिवसीय भारतासाठी त्याने पहिला चौकार मारला होता.
Former Indian Cricketer Sudhir Naik Passed Away : वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिला चौकार लगावणारे क्रिकेटपटू सुधीर नाईक (Sudhir Naik) यांचं निधन झालं आहे. भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांचं आज मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात निधन झालं आहे. त्यानी वयाच्या 78 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात दादरमधल्या आपल्या निवासस्थानी स्नानगृहात तोल जाऊन पडल्यामुळं नाईकांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळं त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. पण नाईकांची प्रकृती हळूहळू ढासळत गेली आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. भारताने 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात सुधीर नाईक हे सुनील गावस्कर यांच्यासोबत सलामीसाठी उतरले होते. एकदिवसीय भारतासाठी त्याने पहिला चौकार मारला होता.
वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी लगावला पहिला चौकार
सुधीर नाईकांनी दोन कसोटी आणि तीन वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. इंग्लंड दौऱ्यातल्या पदार्पणात त्यांनी एजबस्टन कसोटीत 77 धावांची झुंजार खेळी उभारली होती. राष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुधीर नाईक यांची मुंबईचे हीरो म्हणून ओळख होती. त्यांनी प्रथम दर्जाच्या 85 सामन्यांमध्ये चार हजार 376 धावांचा रतीब घातला होता. त्यात सात शतकं आणि 27 अर्धशतकांचा समावेश होता. 1970-1971 साली मुंबईचे रथीमहारथी भारतीय संघातून विंडीज दौऱ्यावर असताना सुधीर नाईकांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईनं रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. सुधीर नाईक या निवृत्तीनंतर मुंबईचे निवड समिती अध्यक्ष आणि वानखेडे स्टेडियमचे पीच क्युरेटर म्हणून सेवा बजावली.
सुधीर नाईक रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार
सुधीर नाईक हे मुंबई क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आणि रणजी ट्रॉफी विजेते कर्णधार होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 1970-71 हंगामात रणजी विजेतेपद पटकावलं. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई आणि अशोक मांकड यांसारख्या मोठ्या खेळाडूंशिवाय मुंबईने त्या मोसमात रणजी करंडक जिंकल्यामुळे नाईक यांच्या नेतृत्वाचं खूप कौतुक झालं.
1972 चा रणजी हंगाम सुरू झाला तेव्हा मुख्य फलंदाज संघात परतल्यामुळे नाईक यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. त्यांनी 1974 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर बर्मिंगहॅम कसोटीत पदार्पण केलं. तिथे त्यांनी 77 धावा करत आपलं एकमेव अर्धशतक झळकावलं. त्यांनी 85 प्रथम श्रेणी सामने खेळले असून आणि 35 पेक्षा जास्त सरासरीने 4376 धावा केल्या, यात दुहेरी शतकासह सात शतकांचा समावेश आहे.
नाईक यांनी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावली. झहीर खानच्या कारकिर्दीत त्यांनी मोठी भूमिका बजावली. ते मुंबई निवड समितीचे अध्यक्षही होते. नंतर त्यांनी वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर म्हणून काम केलं.
2011 च्या विश्वचषकाशी खास नातं
सुधीर नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या व्यवस्थापकीय समितीचाही भाग होते. ते अतिशय जाणकार क्युरेटर होते. त्यांचं 2011 च्या विश्वचषकाशी खास नातं आहे. 2011 च्या विश्वचषकासाठी वानखेडे स्टेडिअमवर पीच तयार करण्यात त्याचे सर्वात मोठे योगदान होतं. त्यांचा राष्ट्रीय क्रिकेट क्लब स्थानिक मुंबई लीगमधील एक चॅम्पियन संघ आहे. झहीर खान, नीलेश कुलकर्णी आणि वसीम जाफर यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटू या संघासाठी खेळले आहेत.