(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Year Ender 2022 : संपूर्ण 2022 वर्षात भारतीय गोलंदाज खराब फॉर्मात, टॉप 10 गोलंदाजांत एकहीजण नाही, वाचा संपूर्ण यादी
Cricket News : 2022 मध्ये भारतीय गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये खास कामगिरी करु शकले नाहीत. वर्षभरात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या कसोटी गोलंदाजांमध्ये टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाचा समावेश नाही.
Team India Test Bowler In 2022 : भारतीय संघ (Team india) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे. यामुळे भारतीय कसोटी क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. पण फायनलमध्ये एन्ट्रीसाठी टीम इंडियाला मायदेशातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागणार आहे. पण यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा फॉर्म पाहिला तर त्यांनी विशेष कामगिरी केलेली नाही. त्याबदल्यात कसोटीत विदेशी गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले आहे.
त्यामुळेच 2022 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा एकही गोलंदाज समाविष्ट नाही. यावरून 2022 साली कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाज खास कामगिरी करु शकलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. तर नेमकं या वर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कोणत्या गोलंदाजांचा समावेश आहे आणि भारतीय गोलंदाजांचं स्थान काय आहे पाहूया...
सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर
2022 मध्ये कसोटीत सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांमध्ये विदेशी गोलंदाजांचाच समावेश आहे. या यादीत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. वर्षाच्या अखेरीस, ऑस्ट्रेलियाचा नॅथन लिऑन आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा हे कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज होते. या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येक 47 विकेट्स घेतल्या. रबाडाने 9 तर लिऑनने 11 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरील केली आहे. या दोन गोलंदाजांशिवाय जॅक लीचने 14 कसोटी सामन्यांत 46, स्टुअर्ट ब्रॉडने 9 कसोटी सामन्यांत 40, जेम्स अँडरसनने 8 कसोटीत 36, पॅट कमिन्सने 10 कसोटीत 36, मिचेल स्टार्कने 11 कसोटीत 35, मेहदी हसन मिराजने 8 कसोटीच 31, प्रभात जयसूर्याने 3 कसोटींत 29, टिम साऊदीने 8 कसोटीत 28, अल्झारी जोसेफने 7 कसोटीत 27, बेन स्टोक्सने 15 कसोटीत 26 विकेट्स घेतले आहेत.
बुमराह 18 व्या क्रमांकावर
2022 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या जगातील टॉप 17 गोलंदाजांमध्ये भारताचा एकही गोलंदाज नाही. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाकडून 18 व्या स्थानावर आहे. यावर्षी तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. 5 कसोटी सामन्यांत त्याने 22 विकेट्स घेतल्या आहेत. तर टीम इंडियाचा गोलंदाज रवीचंद्रन अश्विनही यंदा कसोटीत खास कामगिरी करु शकला नाही. त्याला 6 कसोटीत केवळ 20 विकेट्स घेता आल्या. या दोन गोलंदाजांशिवाय या वर्षी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला कसोटीत 13 पेक्षा जास्त बळी घेता आले नाहीत.
हे देखील वाचा-